केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’च्या मुख्य दक्षता अधिकारी आर. के. पद्मनाभन यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. बँक ऑफ राजस्थानच्या प्रवर्तकांविरुद्धचे प्रकरण कमजोर करण्यात त्यांच्या कथित भूमिकेचा व त्यातून घडलेल्या गैरव्यवहारांसाठी ही चौकशी आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील १९९१ च्या महाराष्ट्र तुकडीचे अधिकारी पद्मनाभन सेबीचे मुख्य दक्षता अधिकारी तसेच तिचे कार्यकारी संचालकही आहेत. त्यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्राथमिक चौकशीचा निर्णय घेतल्याचे कळते.
पद्मनाभन यांनी बँक ऑफ राजस्थानच्या प्रवर्तक – तयाल कुटुंबीयांनी बँकेतील भांडवली मालकी लबाडीने कमी दाखविली आणि त्यामुळे सेबीला पुरेशी दंडाची वसुली त्यांच्याकडून करता आली नाही. या प्रकरणात पद्मनाभन यांची भूमिका महत्त्वाची होती, असा आरोप आहे. बँक ऑफ राजस्थानवर २०१० सालात आयसीआयसीआय बँकेने ताबा मिळविला त्या समयीचे हे प्रकरण आहे.
सेबीकडून बँक ऑफ राजस्थानमधील तयाल कुटुबीयांच्या बँकेतील भांडवली हिस्सेदारीचा तपास त्या वेळी केला गेला. जून २००७ मध्ये ४६.८ टक्के असलेला प्रवर्तकांचा हिस्सा हा डिसेंबर २००९ मध्ये ६३.१५ टक्क्यांवर गेला. तथापि प्रवर्तकांनी तो २८.६१ टक्के असल्याचे जाहीर केले होते. या लबाडीतून तयाल कुटुबीयांनी ७०० कोटी रुपयांचा फायदा कमावल्याचा आरोप आहे. सेबीकडून या प्रकरणात गेल्या वर्षी तपासाअंती या माजी प्रवर्तकांवर केवळ ३० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. प्रत्यक्षात दंडाची रक्कम २००० कोटी रुपयांची असायला हवी होती, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. बँक ऑफ राजस्थानच्या अल्पसंख्य भागधारक गटानेही सेबीकडून झालेल्या तपासात अनेक त्रुटी व उणिवा राहिल्या असल्याचे त्या वेळी म्हटले होते. स्वत: मुख्य दक्षता अधिकारी असलेल्या व्यक्तीने त्यांच्याच विरोधात आलेल्या तक्रारी तपासाव्यात, हा हितसंबंधांचा संघर्षच ठरतो आणि हे नियमाला धरूनही नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.