देशातील दोन प्रमुख रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवांपैकी एक असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सव्र्हिसेस इंडिया लि. (सीडीएसएल)च्या डिमॅट खातेधारकांची संख्येने ऑगस्ट २०१५ अखेर एक कोटींचा टप्पा ओलांडला. दुसरी स्पर्धक डिपॉझिटरी सेवा असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल)ने यापूर्वीच हा टप्पा ओलांडला असून, सध्या तिच्या चालू स्थितीतील डिमॅट खातेधारकाची संख्या १.३९ कोटी इतकी आहे.
एनएसडीएल आणि सीडीएसल या सध्या देशातील दोन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रोख्यांच्या भांडार असलेल्या संस्था आहेत. एक कोटी खातेधारक संख्या पार करून सीडीएसएलचा डिमॅट खात्यांमधील हिस्सेदारी ४२ टक्के झाली आहे. गत दहा वर्षांत मात्र सरासरी ५४ टक्के दराने तिने वाढ साधली आहे. शून्य देखभाल खर्च (कस्टडी चार्जेस), डिमॅट खात्यात नव्याने भर पडणाऱ्या रोख्यांवर शून्य अधिभार, खात्यातील प्रत्येक व्यवहारावर यथामूल्य शुल्क आकारणीत करण्यात आलेली कपात, तसेच तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेवा गुणवत्तेत केलेली सुधारणा या घटकांमुळे साधलेला हा सुपरिणाम आहे, असे सीडीएसएलचे अध्यक्ष एन. रंगाचारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. केवळ खातेधारक नव्हे, तर मध्यम बँका व वित्तसंस्थांचे डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट-डीपी म्हणून सीडीएसएलशी भागीदारी गेल्या १० वर्षांत लक्षणीय वाढत आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘नागरिकांच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी एकच सामाईक डिमॅट खाते’ हे स्वप्न भविष्यात सत्यात उतरविण्यासाठी सरकारी विभाग आणि नियामकांबरोबर चर्चा-संवाद सुरू असून, ही गुंतवणूकदारांच्या खर्चात मोठी बचत करणारी व अनेकांगांनी सोयीची बाब ठरेल.