जगभरात वाहनांच्या सुरक्षिततेसंबंधाने असलेल्या मानदंडांशी जुळवून घेणारी नव्या वाहनात समावेश करावयाची सुरक्षा वैशिष्टय़े निश्चित करणाऱ्या समितीची सरकारने स्थापना केली असल्याचे मंगळवारी लोकसभेत सांगण्यात आले. अपघातप्रसंगी प्रवासी कारच्या घातक्षमतेच्या कसोटीचा अर्थात ‘क्रॅश’ चाचण्यांचा भारतीय अध्यायही सरकार लवकरच सुरू करणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘भारत न्यू व्हेइकल सेफ्टी असेसमेंट’ या कार्यक्रमांतर्गत नव्या वाहनांसाठी सुरक्षा वैशिष्टय़े ठरविणारी तज्ज्ञ समिती स्थापित केली असून, या समितीच्या शिफारशींचे पालन ऑक्टोबर २०१७ पर्यंत ऐच्छिक असेल, तर ऑक्टोबर २०२० पासून त्यांचे सक्तीने पालन करावे लागेल, असे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्राचे युरोपसाठी आर्थिक आयोग (युनेसे)च्या नियमांप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा मानदंडांची निश्चिती केली जाणार आहे, असे सिद्धेश्वरा यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व कार निर्मात्या कंपन्या सध्या त्यांच्या मोटारींच्या निर्मितीविषयक मानकांचे पालन करीत आहेत.