नवीन वस्त्रोद्योग धोरणाचा मसुदा तयार असून त्याला अंतिम रूप देऊन फेब्रुवारीतील अर्थसंकल्पानंतर ते अधिकृतपणे जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनी गुप्ता यांनी बुधवारी येथे बोलताना दिली. वस्त्रनिर्मात्यांची संघटना- ‘सीएमएआय’च्या ६० व्या राष्ट्रीय पोशाख मेळ्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात हे प्रदर्शन गुरुवार सायंकाळपर्यंत सुरू असेल. केंद्राने देशभरात वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन म्हणून ६१ टेक्स्टाइल उद्यानांना मंजुरी दिली असून, पैकी ५५ उद्याने कार्यरतही झाली असून, विशाखापट्टणम आणि कोइम्बतूर या उद्यानांची कामगिरी खूपच उत्साहवर्धक असल्याचे किरण सोनी गुप्ता यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे येत्या काळात आणखी १३ उद्यानांच्या स्थापनेसंबंधी प्रक्रियेवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर पूवरेत्तर प्रदेशांच्या एकंदर आर्थिक विकासात अ‍ॅग्रो-टेक्स्टाइल आणि जिओ-टेक्स्टाइलची भूमिका महत्त्वाची राहील, असे त्या म्हणाल्या. व्यापार ते व्यापार धाटणीच्या मेळ्यात देशातील तयार वस्त्रांच्या ३०० नाममुद्रांचा विविध २६० दालनांद्वारे यंदा सहभाग झाला असल्याचे सीएमएआयचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले.