जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत वाईट वर्ष राहिलेल्या २०१५-१६ सालात भारतातील रसायन निर्यातीने एकूण प्रमाणाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांची वाढ नोंदविली. चालू वर्षांत (एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७) निर्यात किमतीच्या दृष्टीने १.५ टक्क्यांनी तर एकूण प्रमाणाच्या दृष्टीने ७.५९ टक्क्यांनी वाढली आहे. रसायन निर्यातदारांकडून दिसून आलेल्या या कणखर बाण्याबद्दल गौरवोद्गार काढताना, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी, सरकारने टाकलेल्या उद्योगपूरक पावलांचे दृश्य परिणाम हे येत्या वर्षांपासून पुढे अधिक ठोस स्वरूपात दिसून येतील, अशी ग्वाहीही दिली.

भारत हा जगातील सहावा मोठा, तर आशियातील तिसरा मोठा रसायनांचे उत्पादन घेणारा देश आहे. भारतातील रसायन उद्योगात २० लाख लोकांना रोजगार पुरविला जात आहे. तब्बल १४७ अब्ज अमेरिकी डॉलर उलाढालीच्या या उद्योग क्षेत्राने २०१५-१६ सालात ११.६८ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर २०१६-१७ च्या नऊ  महिन्यांत निर्यात ९.७६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मुंबईत आयोजित केमिक्सिल निर्यात पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांचे अभिनंदन करताना, सीतारामन पुढे म्हणाल्या, ‘‘विपरीत जागतिक परिस्थितीतही रसायन उद्योगाने खूपच दांडगी कणखरता दाखविली आहे. रसायन उद्योगाची ही कामगिरी अन्य उद्योगांनाही प्रेरित करणारी आहे. भारतातील एरंडेल तेलाचा जागतिक बाजारपेठेतील ९० टक्के वाटा प्रशंसनीयच आहे आणि काही उत्पादन वर्गात आपल्या पूर्ण वर्चस्वाचे हे उत्तम उदाहरणही आहे.’’

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

यंदाच्या २०१५-१६ सालच्या केमिक्सिल पुरस्कार सोहळ्यात विविध वर्गवारीत एकूण ५५ पुरस्कार वितरित करण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजला रसायन क्षेत्रात, डाइज व डाय इंटरमिडिएट्समध्ये अम्बुजा इंटरमिडिएट्स, एरंडेल तेल व स्पेशालिटी केमिकल्समध्ये इशेडू अँग्रोकेम आणि कॉस्मेटिक्स व टॉयलेटरीजमध्ये व्हीव्हीएफ इंडिया यांना सर्वोत्कृष्ट निर्यातदार म्हणून सन्मानित करण्यात आले. अमि प्थालो पिग्मेंट्सचे शंकरभाई पटेल आणि एम्मेसार बायोटेक अँड न्यूट्रिशनचे अशोक मणीलाल कडाकिया हे जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले.

कडाकिया यांना रसायन उद्य्ोगाचा सुमारे ५० वर्षांचा अनुभव आहे आणि या क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्याचा मान त्यांच्याकडे जातो. ते अशोक ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लि. आणि अशोक अल्कोकेम लि. या कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

निर्यातदारांच्या वाढीच्या निर्धाराला सरकारचे दमदार पाठबळ हे प्रत्येक पुरस्कारार्थीच्या यशाचे सूत्र असून यातून जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अधिकाधिक उंचावत चालला आहे, असे प्रतिपादन केमिक्सिलचे अध्यक्ष सतीश वाघ यांनी केले. वाघ यांच्या मते, भारताकडे प्रतिभा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आधीपासूनच आहेत. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांकरिता कॉर्पोरेट करात ५ टक्क्यांची सवलतीने निर्यातदारांना खर्चात कपातीस मदत मिळाली आहे.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]