निर्देशांक पडझडीची हॅट्ट्रिक नोंदविणारे चिनी भांडवली बाजार गुरुवारी एकदम दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. चीनमधील प्रमुख निर्देशांक तब्बल ५ टक्क्यांची वाढ नोंदविते झाले. युरोपसह अमेरिकेच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये नोंदली जात असलेली तेजी पाहून चीनमधील भांडवली बाजारातही गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा क्रम राखला.
चीनचा शांघाय कम्पोझिट निर्देशांक ५.३ टक्क्यांनी झेपावला, तर हाँगकाँगचा हँग सँगही २.९ टक्के वाढ राखता झाला. आशियातील टोक्योचा निक्की १.१%, सिडनीचा एस अ‍ॅण्ड पी एएसएक्स २०० १.२%, सेऊलचा कॉस्पी ०.७% टक्क्यांनी वाढला होता.
अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे चीनमधील निर्देशांक गेले आठवडाभर तब्बल २० टक्क्यांनी कोसळले. सप्ताहारंभीच्या व्यवहारातील त्याच्या घसरणीचे प्रमाण तर एकाच सत्रात १० टक्क्यांपर्यंतचे होते. गुरुवारी मात्र निर्देशांकांनी ३० जूननंतरची सर्वोत्तम उसळी एकाच दिवशी घेतली.
युरोप, अमेरिकेतील
बाजारांचीही चढ
युरोपीय, अमेरिकी बाजारांनीही गुरुवारची सुरुवात तेजीसह केली. बुधवारच्या तेजीच्या प्रवासावर नजर ठेवत चिनी निर्देशांकांनी वाढ नोंदविल्यानंतर विकसित देशातील प्रमुख निर्देशांकही गुरुवारचे सुरुवातीचे व्यवहार वाढीने करत होते.
फ्रान्सचा कॅक ४०, जर्मनीचा डॅक्स यामध्ये २.५ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली जात होती. अमेरिकेतील डाऊ जोन्स औद्योगिक निर्देशांकाने बुधवारीच तब्बल ४ टक्क्यांची वाढ नोंदविल्यानंतर गुरुवारचा प्रवासही वाढीसह सुरू केला.
डाऊ जोन्स २००८ मधील मंदीच्या कालावधीनंतर प्रथमच या प्रमाणात यंदा वाढला आहे. यापूर्वीच्या सलग सहा व्यवहारांत अमेरिकी बाजारातील गुंतवणूक २ लाख कोटी डॉलरने कमी झाली होती. तेथील नॅसडेक, एस अ‍ॅण्ड पी ५०० ही त्याच प्रमाणात बुधवारी वाढले.