स्मार्टफोनच्या जागतिक घोडदौडीला चिनी लगाम
विशेषत: भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांतून वाढलेल्या मागणीमुळे जागतिक स्तरावर स्मार्टफोन्सची विक्री सरलेल्या जानेवारी ते मार्च २०१५ तिमाहीत ३३.६ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षांतील याच तिमाहीतील विक्रीच्या तुलनेत ती तब्बल १९.३ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मुख्यत: चीनमधून मागणीला मर्यादा येणार असल्याने आगामी काळात स्मार्टफोन्सच्या वाढीला बांध लागेल, असेही कयास वर्तविण्यात येत आहेत.
स्मार्टफोन बाजारपेठेचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘गार्टनर’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चीन वगळता आशिया पॅसिफिक क्षेत्र, पूर्व युरोप, आखाती देश आणि उत्तर आफ्रिका हे स्मार्टफोनच्या मागणीला मोठा हातभार लावणाऱ्या उदयोन्मुख बाजारपेठा ठरल्या आहेत. या क्षेत्रांतून सरलेल्या तिमाहीत एकूण मागणीत ४० टक्क्यांनी वाढीचे योगदान दिले आहे.
सरलेल्या तिमाहीत एकूण मोबाइल फोनच्या बाजारपेठेने (स्मार्टफोनसह सामान्य फीचर फोन) विक्रीत २.५ टक्क्यांची माफक वाढ दर्शवून ती ४६.२ कोटींवर नेली आहे, असे गार्टनरने स्पष्ट केले आहे. मोबाइल बाजारपेठेवर सॅमसंगचा वरचष्मा हा २१.३ टक्के बाजारहिश्श्यासह कायम आहे. त्या खालोखाल अ‍ॅपल (१३.१ टक्के), मायक्रोसॉफ्ट (७.२ टक्के), एलजी इलेक्ट्रॉनिक्स (४.३ टक्के) आणि लेनोव्हो (४.२ टक्के) असा बाजारहिस्सा आहे. गार्टनरचे संशोधक संचालक अंशुल गुप्ता यांनी उत्तरोत्तर स्थानिक आणि चिनी बनावटीच्या मोबाइल ब्रॅण्ड्सकडून वेगाने बाजारहिस्सा कमावला जातो याकडेही लक्ष वेधले. गतवर्षांच्या तुलनेत त्यांच्या विक्रीचा वृद्धिदर हा लक्षणीय ७३ टक्क्यांनी वाढला आहे. तर एकूण जागतिक बाजारपेठेत त्यांचा हिस्सा हा गतवर्षांतील मार्चअखेर असलेल्या ३८ टक्क्यांवरून ४७ टक्के असा वाढला आहे.
त्याउलट सॅमसंग जरी आज अग्रस्थानी असला तरी त्यांचा बाजारहिस्सा व विक्रीतही निरंतर घसरण सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. अ‍ॅपलने मात्र निरंतर सशक्त विक्री कामगिरी सुरू ठेवली असून, विशेषत: चीनमधून आयफोनच्या बहारदार मागणीमुळे सरलेल्या तिमाहीत अ‍ॅपल फोनच्या विक्रीने भरघोस ७२.५ टक्क्यांची वाढ दाखविली आहे.

‘ओप्पो’ हँडसेट्सचा लवकरच भारतात जुळणी प्रकल्प
नवी दिल्ली: चिनी मोबाईल फोन निर्माता ओप्पोने भारतातून वाढत असलेली मागणी पाहता, येत्या ऑगस्टपासून देशांतर्गत जुळणी प्रकल्प स्थापित करून पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ओप्पो मोबाईल्स इंडियाचे मुख्याधिकारी टॉम लू यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठ तसेच नजीकच्या देशात निर्यातही करता येईल इतक्या क्षमतेच्या प्रकल्पासाठी चाचपणी कंपनीने सुरू केली आहे. तथापि या संबंधाने गुंतवणूक रक्कम व अन्य तपशील त्यांनी दिला नाही. शिओमी, कूलपॅड आणि जिओनी या हँडसेट्स निर्मात्या विदेशी कंपन्यांनीही भारतातून उत्पादन घेण्याचा मानस अलीकडेच स्पष्ट केला आहे.

मात्र भविष्यात वाढीला बांध : आयडीसी
वॉशिंग्टन: आगामी काळात जागतिक स्तरावर स्मार्टफोनची वाढ मंदावेल, असा इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी)ने भाकीत वर्तविले आहे. स्मार्टफोन्सच्या मागणीत वाढीचा दर हा विद्यमान २०१५ सालात ११.३ टक्क्यांवर स्थिरावेल. सरलेल्या २०१४ सालात हा दर २७.६ टक्के होता. चीन हा गुगलच्या अँड्रॉइडसमर्थ कार्यप्रणालीवर आधारित स्मार्टफोनची महत्त्वाची बाजारपेठ असून, विद्यमान वर्षांतील पहिल्या तिमाहीत तेथून मागणीला रोडावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
आयडीसीच्या मते चालू वर्षांत दोन महत्त्वाच्या शक्यतांवर लक्ष ठेवावे लागेल. जसे अपेक्षा केली जात आहे त्याप्रमाणे जागतिक वाढदरापेक्षा चीनमधून स्मार्टफोनच्या मागणीतील वाढीचा दर हा पहिल्यांदाच लक्षणीय म्हणजे २.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. दुसरे म्हणजे चीनने स्वत:च केलेल्या भाकितापेक्षा जागतिक बाजारपेठेच्या सरासरीच्या तुलनेत त्या देशातील वाढीचा दर हा ८.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. या दोन्ही शक्यता नकारार्थीच असून त्यातून एकूण जागतिक मागणीला लक्षणीयरीत्या प्रभावित केले जाणार आहे. जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत एकटय़ा चीनचा वाटा अलीकडच्या वर्षांत ३६ टक्के इतका आहे.

राज्यात १,५०० कोटींची गुंतवणूक व विस्तार
पुणे : थ्रीजी व टुजीसाठीचे नेटवर्क तसेच रिटेल विस्तारावर भर देतानाच सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशा शब्दात गेल्या आर्थिक वर्षांच्या वित्तीय व व्यावसायिक कामगिरीतील महाराष्ट्र परिमंडळाचा प्रवास व्होडाफोन कंपनीने नोंदविला.
ग्राहकसंख्येत व्होडाफोन ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी आहे. कंपनीच्या महाराष्ट्र व गोवा या एकत्रित परिमंडळाच्या कामगिरीबाबत या विभागाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांनी येथे सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने या भागात नव्या ३,००० थ्रीजी व टुजीचे संपर्क (साईट) वाढविले आहेत. ही संख्या आता ५,००० हून अधिक झाली आहे. त्यासाठीची या कालावधीतील एकूण गुंतवणूकही १,५०० कोटी रुपये झाली आहे. मुंबई वगळता दोन राज्यांचा समावेश असलेल्या या परिमंडळात कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत नवे १९ लाख ग्राहक जोडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.