भारत आणि चीन यांच्यातील व्यापारतोल भारतासाठी ऋण असतानाच सन २०२५ मध्ये चीनची भारतातील थेट गुंतवणूक ३० अब्ज डॉलर्सवर जाईल, असे भाकीत एका पुस्तकामध्ये वर्तविण्यात आले आहे. 

‘द सिल्क रोड डिस्कव्हर्ड’ या गिरिजा पांडे या सिंगापूरस्थित उद्योगिनी व वॉशिंग्टन येथील चायना इंडिया इन्स्टिटय़ूट या संशोधन संस्थेचे अध्यक्ष अनिल गुप्ता व याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हैयान वँग यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सिंगापूर येथे झाले.
या वेळी या त्रयीने उपरोक्त दावा केला.
सन २०२५ पर्यंत भारतातील चीनमधून होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीचा आकडा ३० अब्ज डॉलरला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे, असे या तिघांनीही नमूद केले.
यापैकी भारतीय उद्योजकांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये १० टक्क्यांची मालकी चीनकडे असेल, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून चीन आणि भारत या दोन्ही देशांनी परस्परांच्या उद्योगात प्रवेश केला आहे, मात्र उपरोक्त आकडेवारीत कर्ज किंवा अत्यल्प समभाग धरण्यात आलेले नाहीत, असेही पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पायाभूत सुविधांची निर्मिती आणि निर्यातीसाठी उत्पादनास चालना देणे या दोन प्रमुख उद्योगांमध्ये भारतात चीनतर्फे सर्वाधिक गुंतवणूक असेल, असे भाकीतही या पुस्तकात वर्तविण्यात आले आहे.
भारतातर्फे चीनमधील विद्युत निर्मिती प्रकल्पांकडे सुमारे १० अब्ज डॉलर्सची मागणी नोंदविण्यात आल्याची माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. मात्र चीननेही आपली बाजारपेठ अधिक खुली करण्याचा सल्ला पुस्तकात देण्यात आला आहे.