पाच लाख फोनसह रिलायन्स जीओचीही आगेकूच

भारतीय बाजारपेठेतील चिनी स्मार्टफोनचा शिरकाव वाढत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण १७.१ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान भारतात २.७५ कोटी चिनी स्मार्टफोन आले आहेत.

लेनोवो, शिओमी, वायो आदी चिनी बनावटींच्या मोबाइलची प्रामुख्याने भारतातील विक्री गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्याचे ‘आयडीसी’च्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

यापूर्वीच्या सलग दोन तिमाहीनंतर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मात्र चिनी स्मार्टफोनचे भारतातील आगमन लक्षणीय वाढले आहे.

भारतातील स्मार्टफोन क्षेत्रात सॅमसंगचा वरचष्मा अद्यापही कायम आहे. कोरियन कंपनीचा हा हिस्सा सर्वाधिक, २५.१ टक्के आहे. तर पाठोपाठ मायक्रोमॅक्स (१२.९ टक्के), लेनोवो (७.७ टक्के), इंटेक्स (७.१ टक्के) तसेच रिलायन्स जिओ (६.८ टक्के) यांचा सर्वाधिक स्मार्टफोन संख्येत क्रम आहे.

स्मार्टफोनना भारतीयांची पसंती वाढत असतानाच चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत फीचर फोनची संख्या २.६ टक्क्यांनी वाढली आहे.

भारतीय तसेच अन्य विदेशी कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री कमी होत आहे. तुलनेत चिनी कंपन्यांच्या आघाडीच्या कंपन्यांची विक्री तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

लेनोवो हीच चिनी कंपनी काही वर्षांपूर्वी भारतीय स्मार्टफोन बाजारात होती. मात्र गेल्या काही कालावधीत चिनी स्मार्टफोन उत्पादकांचे येथील प्रमाण वाढत गेले. या कंपन्यांकडून १०,००० रुपयेपर्यंतच्या स्मार्टफोनचे उत्पादन व उपलब्धता येथे झाल्याने भारतीय खरेदीदारांकडूनही त्यासाठी प्रतिसाद नोंदला गेला.

रिलायन्स जीओच्या ४जी तंत्रज्ञानावरील मोबाइलची संख्या ५ लाख झाल्याचे सांगण्यात येते. ३,५०० रुपये फोनची किंमत असलेल्या या कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर १.५० लाख मोबाइलची चाचणीदेखील सुरू केली आहे.