‘कोल इंडिया लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमातील १० टक्के समभागांची निर्गुतवणूक करण्याचा सरकारचा निर्णय चांगलाच यशस्वी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न देताही या निर्गुतवणूक प्रक्रियेतून २२ हजार ६०० कोटी रुपये उभे राहिले. खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी समभाग विक्री ठरली आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड’नेच २०१० मध्ये केलेला १५ हजार कोटींच्या समभाग विक्रीचा विक्रम शुक्रवारी मोडला, मात्र त्याच वेळी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्व्हेस्टर्स) राखीव करून ठेवण्यात आलेल्या १२.६३ कोटींच्या समभाग विक्रीस अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या समभागांपैकी निम्म्या समभागांचीही विक्री होऊ शकली नाही.
विदेशी वित्तसंस्था, म्युच्युअल फंड, बँका आणि विमा कंपन्या व छोटय़ा गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीस जोरदार प्रतिसाद दिला.