सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा कोळसा उत्पादक कंपनीचे लक्ष्य अवघ्या ३ टक्क्य़ांनी हुकले आहे. कोल इंडियाने २०१४-१५ मध्ये ४९.४२ कोटी टन उत्पादन घेतले आहे.
कंपनीने गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ५०.७ कोटी टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. कंपनीचे गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यातील उत्पादनही ५.७२ कोटी टन उद्दिष्टापेक्षा कमी, ५.६८ टन झाले आहे.
सार्वजनिक कंपनीतील सरकारी हिस्सा खरेदीच्या निर्णयाने कंपनीला गेल्याच आर्थिक वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या संपाला सामोरे जावे लागले होते. त्याचा परिणामही कोळसा उत्पादनावर नोंदला गेला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या मध्यस्थीने संप दोन दिवसात संपुष्टात आला होता.
कोल इंडियाने आधीच्या, २०१३-१४ मध्ये ४६.२५ टन कोळसा उत्पादन केले होते. पुढील आर्थिक वर्षांत कोळसा उत्पादन कमी होईल, अशी भीती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. भट्टाचार्य यांनीही व्यक्त केली होती. २०१९-२० पर्यंत ९२.५ कोटी टन कोळशाचे उत्पादनही आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तब्बल पाच वर्षांनंतर ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स’मध्ये वाढ
पीटीआय, नागपूर<br />सार्वजनिक क्षेत्रातीलच मिनी रत्न म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्रातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (डब्ल्यूसीएल) तब्बल पाच वर्षांनंतर कोळसा उत्पादनातील वाढ नोंदविली आहे. नागपूरस्थित या कंपनीने २०१४-१५ आर्थिक वर्षांत ४.११ टन कोळसा उत्पादन केले असून आधीच्या वर्षांतील ३.९७ कोटी टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ते ३.६ टक्क्य़ांनी वाढले आहे. ‘डब्ल्यूसीएल’ ही कोल इंडियाचीच उप कंपनी आहे. कंपनीने यापूर्वी २००९-१० मध्ये उत्पादनातील वाढ नोंदविली होती. त्यानंतर त्यात सातत्याने घसरण नोंदली गेली. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत ७० लाख टन वार्षिक क्षमतेचे तीन नवे कोळसा प्रकल्प उभारले.