उत्तर भारतात गेल्या ४४ वर्षांतील सर्वात कडाक्याच्या थंड हवामानामुळे  यंदाच्या जानेवारीत आयातीत कोळशाची मागणी आणखीच वाढली आहे. २०११-१२ सालात मुख्यत: वीजनिर्मितीसाठी भारतात १०.३० कोटी टन कोळशाची आयात केली जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तर देशांतर्गत उत्पादनात जेमतेम ७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ऑक्टोबर २०१२ पासूनच कोळसा आयातीला जोर चढला असला तरी देशातील अनेक औष्णिक ऊर्जा प्रकल्प पुरेशा कोळशाअभावी बंद ठेवावे लागल्याचे चित्र दिसत आहे. कोळशाच्या या दुर्भिक्षाच्या समस्येत कमालीच्या वाढलेला हवामानातील आणि धोरणकर्त्यांमधील गारठा भर घालणारा ठरत आहे.