शीतपेयाच्या क्षेत्रातील जागतिक नाममुद्रा कोका-कोलाने भारतातील आपल्या फळांच्या पेयाचे ब्रॅण्ड ‘माजा’साठी आंबा गराचा पुरवठा मिळविण्यासाठी जैन इरिगेशन लिमिटेडशी सामंजस्याने १० वर्षे कालावधीची संयुक्त मोहीम आखली आहे. उभयतांकडून ५० कोटींची गुंतवणूक केल्या जाणाऱ्या या मोहिमेचे सुमारे २५ हजार आंबा बागायतदार लाभार्थी ठरतील.
हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेस प्रा. लि.चे मुख्याधिकारी टी. कृष्णकुमार आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या उपस्थितीत आंबा बागायतीला चालना देणाऱ्या ‘प्रोजेक्ट उन्नती’ या संयुक्त मोहिमेची सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. या धर्तीच्या संयुक्त मोहिमेचा हा दुसरा टप्पा असून, कमी जागेत अधिक झाडांची लागवड करून अधिकाधिक आंबा उत्पादन तुलनेत अल्प खर्चात मिळवून देणाऱ्या ‘अल्टा हाय डेन्सिटी प्लँटेशन (यूएचडीपी)’ या जैन इरिगेशनने विकसित केलेल्या लागवड तंत्राचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना चालना या प्रकल्पातून दिली जाते. पारंपरिक पद्धतीत आंब्याच्या एक एकर बागेत साधारण ४० झाडेच लावली जातात, त्या उलट यूएचडीपी पद्धतीने लागवडीत एकरी ६०० झाडांच्या लागवड होऊन तीन-साडेतीन वर्षांतच झाडांना फळेही लागतात, असा कंपनीचा दावा आहे.
‘प्रोजेक्ट उन्नती’च्या पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या बागायतदारांकडून सध्या ‘माजा’साठी ७० टक्के तोतापुरी आंब्याचा पुरवठा मिळविला जातो. तर दुसऱ्या टप्प्यातील या दशवार्षिक प्रकल्पातून देशभरात २५,००० आंबा शेतकऱ्यांना सामावले जाऊन, त्यांच्याकडून सुमारे ५० हजार एकर क्षेत्र ‘यूएचडीपी’ पद्धतीने आंबा लागवडीखाली आणण्याचे लक्ष्य उभय कंपन्यांनी ठेवले आहे. यातून तब्बल ३,००० मेट्रिक टनाने आंब्याचा पुरवठा वाढेल आणि मागणीतील वाढ जमेस धरून ‘माजा’साठी आवश्यक आंबा गराची १०० टक्के गरज २०२२-२३ पर्यंत या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल, असे अपेक्षित आहे.