मान्सूनला विलंब म्हणजे लांबलेला उन्हाळा आणि आयपीएल, फिफासारख्या खेळांचा मोसम असे पोषक वातावरण यंदा एकूण शीतपेय उद्योगाला लाभले. अशा स्थितीत या क्षेत्रातील आघाडीच्या कोका-कोलाने यंदा अधिक भर व्यवसाय-विस्तारावरही दिला. कंपनीच्या भारत आणि दक्षिण पश्चिम एशिया विभागाचे अध्यक्ष व्यंकटेश किणी यांनी या जोरावरच या नाममुद्रेला २०२० पर्यंत पहिल्या पाच क्रमांकाच्या पंक्तीत नेऊन ठेवण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडला.
याबाबत व्यंकटेश केणी यांच्याशी झालेली बातचीत..
* यंदाच्या मोसमात बाजारपेठेत उत्पादन पोहोचण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागला का?
– सातत्याने बदलणारा मध्यमवर्ग, खर्च करण्यासाठी मुबलक उत्पन्न, बदलती जीवनशैली आणि सवयी हे शीतपेयांच्या उद्योगाच्या वाढीला खतपाणी घालणारे घटक आहेत. भारतीय पॅकेज्ड पेयांच्या उद्योगांच्या वाढीला किती वाव आहे, यावरही ते प्रकाशझोत टाकते. पॅकेज्ड पेयांच्या विकासाच्या संधी मुबलक आहेत आणि संपूर्ण दिवसभरात दररोज प्यायचे पेय म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी भारतात आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांचा प्रवास एका निश्चित दिशेने झाला पाहिजे, असे आम्हाला वाटते. कंपनीबाबत सांगायचे तर कोका-कोलाच्या उत्पादनांचा वार्षिक दरडोई खप १४ आहे, तर जागतिक पातळीवर तो ९४ आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत विस्ताराला खूप वाव दिसत आहे. देशातील शीतपेयांचा दरडोई खप ४५ आहे.
*  उपलब्ध संधींचा वापर कोका-कोला कशा प्रकारे करणार आहे? त्यासाठी काही विशेष योजना आहेत का?
– यंत्रणा या दृष्टिकोनातून यंदा आम्ही ‘कोक’ आणि इतर पेयांना अधिक दूरवर पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या सुधारित वितरणाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना उत्पादन मिळावे यासाठीही आम्ही काम करीत आहोत. उत्पादन आणि वितरणाच्या नवीन आराखडय़ावरही आम्ही प्रयोग करीत आहोत. या योजनेंतर्गत आम्ही छोटय़ा दुकानांमध्ये नव्या प्रसारमोहिमा राबवीत आहोत. मोठय़ा समारंभांच्या ठिकाणी किंवा अगदी साध्या, छोटय़ा कार्यक्रमांमध्येही आम्ही उत्पादन सॅम्पलसारखा पर्याय निवडला आहे.
ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही मोबाइल या माध्यमाचा वापर करीत आहोत. जिथे प्रसारमाध्यमे मोठय़ा प्रमाणावर पोहोचलेली नाहीत तिथे मोबाइल हे माध्यम प्रभावी ठरते. ज्यामार्फत आम्ही ग्रामीण भागातल्या ग्राहकांशी संवाद साधू शकतो. याची सुरुवात म्हणून ग्राहकांना ताजेतवाने करण्यासाठी आम्ही कोका-कोलाच्या नवीन जाहिरातींसाठी दीपिका पदुकोन आणि फरहान अख्तर या दोन कलाकारांना घेतले. त्यांच्या माध्यमातून आम्ही महानगर तसेच छोटय़ा शहरांमधल्या ग्राहकांना लक्ष्य केले. या वर्षी आम्ही कमी तसेच शून्य कॅलरीच्या पेयांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत.
*कोका-कोला भारतातील व्यवसायाकडे कसे पाहते? कंपनी येथे निर्मितीच्या दृष्टीने काही प्रयत्न करणार आहे का?
– भारतीय अर्थव्यवस्था आणि पॅकेज्ड शीतपेयांचे उद्योग क्षेत्र हे दीर्घ कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे विकसित होईल यावर कोका-कोलाला पूर्ण विश्वास आहे. पॅकेज्ड पेयाद्वारे शरीराची तहान भागण्यासह त्याला पोषक द्रव्य पुरविण्यातही सहकार्य करतात. याद्वारे ग्राहकांना सातत्याने उत्तम दर्जा आणि चवीचा अनुभव देता येतो. ते साध्य करण्यासाठी आम्ही २०२० पर्यंत कंपनीच्या जगभरातल्या प्रथम पाच यशस्वी उद्योगधंद्यांच्या यादीत स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी येथे ५०० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचीही योजना प्रगतिपथावर आहे. कंपनीच्या येथील विद्यमान निर्मिती प्रकल्पांमध्ये उत्पादनक्षमता वाढविणे, वितरण व पुरवठा यंत्रणा बळकट करणे, किरकोळ विक्रीचे दालन विस्तारणे, संशोधनात आणखी भर टाकणे यासाठी ही गुंतवणूक असेल. कंपनी येथे हरितपट्टा प्रकल्पही साकारण्याच्या तयारीत आहे.
* उन्हाळा लवकर सुरू झाला आणि पाराही सतत चढाच राहिला आहे. तुलनेत यंदा मान्सूनही हवा तसा नाही. तेव्हा तुमच्या उत्पादनांच्या मागणीकडे (ग्रामीण बाजारपेठ अंतर्भूत करून) कसे पाहता?
– देशातल्या वेगवेगळ्या भागांतले वातावरण वेगवेगळे आहे. आम्ही आमच्या पेयांच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना उत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ग्राहकांना परवडण्याजोग्या किमतीत पॅकेजेस आणि पोर्शनचे विविध पर्याय देऊ इच्छितो. आमच्या ग्रामीण योजनेमध्ये कोका-कोला इंडिया ग्रामीण भागातल्या ग्राहकांना उच्च दर्जाची, उत्तम चवीची, ताजीतवानी करणारी पेये देण्यावर भर देण्यात आला आहे. हे करण्यासाठी आम्ही ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पेय उपलब्ध करून दिले आहे. थोडक्यात, आम्ही ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेणार आहोत आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या वितरण आणि पुरवठय़ाच्या जाळ्यावर पूर्णपणे विसंबून आहोत. भविष्यकाळातली आमची उद्दिष्टय़े म्हणजे, मोसमावरचे व्यापाराचे अवलंबन कमी करणे, ग्रामीण भागात अधिकाधिक पोहोचणे, योजनाबद्ध अंमलबजावणी, योजनाबद्ध संवाद असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.