‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम (RGESS)l )’ या योजनेसंबंधी गुंतवणूकदारांच्या शंकाचे समाधान करणारा लेखांक चौथा
* या योजनेच्या अंतर्गत ५०,००० रुपये इतक्या रकमेचे शेअर्स खरेदी केले आहेत. नियमानुसार ते माझ्या डिमॅट खात्यात लॉक इन म्हणून दाखवले जात आहेत. समजा तीन महिन्यानंतर त्या शेअर्सचे भाव गडगडले व एकून पोर्टफोलिओची रक्कम ३५,००० रुपये इतकीच राहिली तर मला उर्वरीत रक्कम म्हणजे १५,००० रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी करावे लागतील का?
उत्तर : नाही. यात तुमचा दोष नाही म्हणून अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याची गरज नाही.

* समजा उलट झाले. मूळ ५०,००० रुपयांच्या शेअर्सचा भाव वाढून पोर्टफोलिओची रक्कम एकूण ८०,००० झाली. एक वर्ष ‘लॉक इन’चा काळ उलटल्यानंतर दुसऱ्या वर्षांत म्हणजे लवचिक ‘लॉक इन’ काळ वर्षांत मी ३०,००० रुपये किंमतीचे शेअर्स विकून फायदा करून घेऊ शकतो का. तितक्याच रकमेचे नवीन शेअर्स घ्यावे लागतील का?
उत्तर :  नाही. जेव्हा तुम्ही शेअर्स विकलेत तेव्हा तितकी रक्कम मूळ पोर्टफोलिओमधून वजा जाता ५०,००० रुपयांची तुमची गुंतवणूक आहेच ना! भले त्यानंतर काही दिवसांनी त्या उर्वरीत शेअर्सची किंमत २०,००० झाली तरी तुम्हाला काही करावे लागणार नाही.

* या योजनेचे जे परिपत्रक आहे त्यात RGESS खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड सक्तीचे आहे असे म्हटलेले आहे. तसे पाहता आजवर प्रत्येक डिमॅट खाते उघडताना पॅन कार्ड सक्तीचे आहेच. मग हा खास उल्लेख कशासाठी?
उत्तर : साधे डिमॅट खाते उघडताना सिक्कीमचे नागरिक वगरे काही गटातील लोकाना पॅन कार्ड सक्तीचे नाही. मात्र त्यांना RGESS अंतर्गत डिमॅट खाते उघडायचे असेल तर पॅन कार्ड आवश्यकच आहे.

* १ जानेवारी २००७ पासून शेअर बाजारात ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड सक्तीचे झाले आहे. त्यानुसार दोन्ही डिपॉझिटरी संबधित स्टॉक एक्स्चेंजकडून संभाव्य RGESS गुंतवणूकदारांबाबत तपशील मागवून घेणार असे वाचनात आले. मग ज्यांनी या तारखेपूर्वी डिमॅट खाती उघडली असतील त्यांचा तपशील डिपॉझिटरीला मिळणारच नाही. कारण तेव्हा पॅन कार्ड हे सक्तीचे नव्हते.
उत्तर : अशा सर्व गुंतवणूकदारांकडून म्हणजेच डिमॅट खातेदारांकडून डिपॉझिटरीने पॅन कार्डचा तपशील मागवून घेतला आहे व पॅन क्रमांक त्यांच्या  डिमॅट खात्यात अंतर्भूत केले आहेत. तरी देखील काही थोडक्या लोकांनी पॅन तपशील दिलेले नाही त्यांची डिमॅट खाती सेबीच्या आदेशनुसार गोठविण्यात आली आहेत.

* ज्या मंडळींकडे शेअर्स सर्टिफिकेट स्वरूपात आहेत त्यांनी ते शेअर्स डिमॅट करून घेतले तर ती मंडळी या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात का?
उत्तर : नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी केलेले विवक्षित शेअर्स, विवक्षित म्युच्युअल फंड युनिट याद्वारे खरेदी केलेल्या सिक्युरिटीजच पात्र असतील. शिवाय हे सर्व २३ नोव्हेंबर २०१२ नंतरची खरेदी असेल तरच कारण त्या दिवशी हे योजना जाहीर झाली आहे.

* लवचिक ‘लॉक इन’च्या काळात विकलेल्या शेअर्सच्या रकमेच्या इतके नवीन शेअर्स विकत घेऊन पोर्टफोलिओचा  मूळ आकडा (गुंतवलेली रक्कम)  कायम राखला पाहिजे असा नियम आहे. पण किती दिवसात ही भरपाई केली पाहिजे?
उत्तर : प्रत्येक वर्षांतील किमान २७० दिवस तो आकडा कायम राहिला पाहिजे.

* RGESS डिमॅट खात्यात निर्देशित कंपनीव्यतिरिक्त इतर कंपनींचे शेअर्स देखील खरेदी करून गुंतवणूकदार ठेऊ शकतो. तर मग नियमानुसार ते शेअर्स देखील लॉक इन म्हणूनच डिमॅट खात्यात दाखविले जातील. हा एक प्रकारे गुंतवणूकदारावर अन्याय नाही का?
उत्तर : नक्कीच नाही. कारण यावर उपाय म्हणून फॉर्म बी भरून दिल्यास त्या शेअर्सवरील ‘लॉक इन’चे लेबल काढून ते फ्री शेअर्स म्हणून दाखविले जातील.

* माझ्या डिमॅट खात्यात एका कंपनीचे ४०० शेअर्स आहेत ज्याची किंमत ३०,००० रुपये आहे. समजा कंपनीने ५० शेअर्स बोनस म्हणून दिले तर त्या शेअर्सची किंमत ही गुंतवणूक म्हणून धरली जाईल का?
उत्तर : होय.

* माझ्या मित्राकडून मी निर्देशित गटातील शेअर्स विकत घेऊन डिमॅट खात्यात जमा करून घेतले तर ते या योजनेच्या अंतर्गत लाभास पात्र ठरतील का?
उत्तर : नाही. याला ऑफ मार्केट ट्रान्झॉक्शन म्हणतात जो लाभास पात्र नाही. केवळ स्टॉक एक्स्चेंजच्या मार्फत घेतलेलेच शेअर्स योजनेसाठी पात्र असतील.

* लवचिक ‘लॉक इन’ काळात शेअर्स गहाण (Pledge) ठेऊ शकतो का?
उत्तर : होय. मात्र हा व्यवहार शेअर्स विकले असा समजून मागे लिहिले त्याप्रमाणे तितक्या रकमेचे नवीन दुसरे शेअर्स घ्यावे लागतील.

* माझे पूर्वीच उघडलेले एक डिमॅट खाते आहे ज्यात १००० इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स जमा आहेत. तर मग मी या योजनेत भाग घेऊ शकतो का?
उत्तर : नक्कीच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. कारण इक्विटी शेअर्स किंवा फ्यूचर ऑप्शन यात तुम्ही व्यवहार केलेले नाहीत.