चालू आर्थिक वर्षांची समाप्ती नजीक आली असताना देशातील वाहन उद्योग आता पुन्हा उभारी घेण्याची शक्यता नसल्याचे नोव्हेंबरमधील वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्यात देशातील पहिल्या दोन, मारुती व ह्युंदाई या कंपन्यांना घसरत्या विक्रीचा फटका बसला असून तुलनेत टोयोटा, होंडा, फोर्डसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंनी वाढ नोंदविली आहे.
दिवाळीचा महिना असूनही आघाडीच्या कंपन्यांनी यंदा विक्रीतील घसरण या कालावधीत राखली आहे. महिंद्र, ह्युंदाईसह टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र नोव्हेंबरमध्ये कमी विक्रीला सामोरे गेले आहेत. मारुतीची विक्री ५.९ टक्क्यांनी घसरून ८५,५१० हजारांवर आली आहे. तर निर्यातीत आघाडीवर असलेल्या कोरियाच्या ह्युंदाईने ३.६ टक्के घसरण नोंदवत ३३,५०१ वाहनांची विक्री केली आहे. शेव्हर्ले ब्रॅण्डवाल्या जनरल मोटर्सच्या विक्रीतही १४.१४ टक्के घसरण झाली आहे. कंपनीच्या वाहनांची विक्री यंदा अवघी ६,२१४ झाली. महिंद्रमध्ये २२ टक्के तर टाटा मोटर्समध्ये ४० टक्के घसरण राखली गेली आहे.

असे चित्र असताना अमेरिकन फोर्ड, जपानी होंडा, टायोटा यांच्या विक्रीत यंदा वाढ नोंदली गेली आहे. अमेझच्या जोरावर होंडाने अडीच पट विक्री अधिक नोंदविली आहे. तर नव्याच इकोस्पोर्ट या कॉम्पॅक कारला मिळालेल्या प्रतिसादामुळे फोर्डची विक्री ३३ टक्क्यांनी उंचावली आहे.
भारतीय वाहन उद्योगाच्या आगामी प्रवासाबाबत उत्पादक कंपन्यांच्या ‘सिआम’ या संघटनेचे महासंचालक विष्णू माथुर यांनीही साशंकता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, नोव्हेंबरनंतर आता डिसेंबरमध्येही फारशी आशा नाही. तसेही हा महिना कमी विक्रीचाच म्हणून उद्योगात ओळखला जातो. सणांचा मोसम असूनही ऑक्टोबरमध्ये मोटरसायकल आणि स्पोर्ट युटिलिटी वगळता इतर वाहनप्रकारांत विक्रीतील घसरणच नोंदली गेली आहे. तेव्हा एकूण वर्षांतही या उद्योगाचा वेग नकारात्मक स्थितीत जाण्याची शक्यता आहे.
दुचाकीमध्येही नोव्हेंबरमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले आहे. हीरो मोटोकॉर्प, यामाहा, होंडा यांच्या विक्रीत वाढ तर टीव्हीएसच्या दुचाकींमध्ये घट नोंदली गेली आहे. ५.६ टक्के वाढ राखताना हीरोने ५.३० लाख मासिक विक्रीचा क्रम राखला आहे. होंडामध्येही ४३ टक्के वाढ झाली. यामाहाचा कल यंदा किरकोळ ६.५ टक्के असा वाढला आहे.