भारत चीननंतरचा दुसरा ग्राहक देश
इंटरनॅशनल कॉपर असोसिएशन इंडिया (आयसीए इंडिया) ने हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. आणि वेदांत लि.च्या संयुक्त विद्यमाने अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडिया कॉपर फोरमचे आयोजन केले होते. या फोरममध्ये मंत्रालयातील आणि तांबे उद्योगातील अनेक अधिकारी व तज्ञ मंडळी एकत्र आली होती. या सर्वानी आजच्या घडीला तांबे उद्योगामध्ये उपलब्ध असलेल्या संधी आणि आव्हाने यांच्यावर चर्चा केली.
भारतातील तांबे उद्योग हा ८ अब्ज यूएस डॉलर्स इतके मूल्य असलेला आणि प्रति वर्ष ५ ते ७ टक्के वार्षिक वाढीने हा उद्योग विस्तारत असून त्याने ५०,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळवून दिलेल्या आहेत. भारत सरकारने स्मार्ट सिटी, शहरीकरण आणि पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूकी पुढील २०-२५ वर्षांतही सुरू ठेवल्या तर भारतातील तांबे उपभोगात अजून वाढ होण्याच्या बऱ्याच संधी आहेत. २०२० पर्यंत भारत ही सहाव्या क्रमांकावरील तांबे बाजारपेठ ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात तांब्याचा सर्वात जास्त उपभोग इलेक्ट्रिकल, परिवहन आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये होतो आणि यापुढे स्मार्ट सिटी, ऊर्जा, पारेषण आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये तांब्याची मागणी वाढणार आहे. तांब्याचा २०१४ मधील जागतिक स्तरावरील उपभोग २६.७ दशलक्ष एमटी इतका नोंदवण्यात असून त्यातील ४ टक्के वाटा फक्त भारताचाच आहे. २०१४ मध्ये भारतातील तांब्याचा उपभोग १.१६ दशलक्ष टन्स इतका होता आणि त्यांतील वायर रॉप कॉपरचा उपभोग ६९५ केटी आणि स्ट्रिप्स कॉपरचा उपभोग ४३३ केटी इतका होता.
मुख्य अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आणि अर्थव्यवस्थेतील तांब्याच्या एकंदर योगदानावर भाष्य करताना म्हटले, तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असता आणि रुपयाही ढासळत असताना भारतीय अर्थव्यवस्थेला आधार आणि स्थर्य देऊ शकेल अशा क्षेत्राची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीची वाढ सातत्यपूर्ण आहे, महागाईचा दरही आटोक्यात आहे आणि वित्तीय व वाणिज्य तूटही कमी झाली आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला स्थर्य देण्याकरिता तांबे हे वाढीच्या संधी असलेले आधुनिक क्षेत्र ठरु शकते. परंतु, तांबे क्षेत्रालाही एफटीएमुळे बसलेला कर, निर्यातीवरील सवलती काढून घेतल्या जाणे अशी आव्हाने भेडसावत आहे. भारत सरकारने या समस्यांवर लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना राबवून या क्षेत्राला पुनरुज्जीवन देऊन या क्षेत्रातील वाढीला प्रोत्साहन दिले पाहिजे.
रानडे यांना दुजोरा देताना आणि तांब्याच्या जास्तीत जास्त वापरावर भर देण्याची गरज ठळक करताना भारत सरकारच्या खाण मंत्रालयाचे सचिव बलिवदर कुमार म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत वाढीकरिता तांबे उद्योग अतिशय महत्त्वाचा ठरतो. अर्थव्यवस्थेत सातत्यपूर्ण पद्धतीने वाढ होत असताना आणि ती अधिक मुक्त होत असताना भविष्यामध्ये तांबे उद्योगाच्या वाढीकरिता विपुल संधी उपलब्ध होतील. असे झाले तर पुढील काही वर्षांमध्ये तांब्याच्या धातुकांच्या खाणकाम क्षेत्रात, तांबे उत्पादनामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने वाढ होईल.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव रवि कपूर म्हणाले, जागतिक स्तरावरील व्यापार क्षेत्रात ज्या पद्धतीने बदल होत आहेत ते पाहाता पुढील दशकापर्यंत व्यापार कर इत्यादी समस्या तितक्याशा गंभीर वाटणार नाहीत असे वाटते. जागतिक स्पध्रेत तगून राहायचे असेल तर स्पर्धात्मकता आणि तंत्रज्ञानातील सुधारणा यांसह या उद्योगाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीस लावण्यावर आणि उत्कृष्ठ दर्जाची उत्पादने देऊ करण्यावर भर दिला जाण्याची गरज आहे. भारताने मुक्त व्यापार आणि नियमने सल करणे यांकरिता योग्य ती धोरणे राबविणे आवश्यक आहे.