देशातील प्रमुख आठ उद्योग क्षेत्राची २०१५ च्या सुरुवातीलाच काहीशी खुंटली आहे. जानेवारीमध्ये या क्षेत्राने अवघी १.८ टक्के वाढ राखली आहे. गेल्या १३ महिन्यातील हा या क्षेत्राचा संथ प्रवास आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राकडून पुन्हा रिझव्‍‌र्ह बँकेमार्फतच्या व्याजदर कपातीच्या तगादा लावला जाऊ शकतो.
जानेवारी २०१५ मध्ये खनिज तेल तसेच नैसर्गिक वायू त्याचबरोबर स्टील, सिमेंट आणि वीज क्षेत्रातील निर्मिती ही नकारात्मक नोंदली गेली आहे. यासह खते, शुद्धीकरण उत्पादने आदींची वाढही कमी झाली आहे.
देशाच्या अर्थ प्रगतीत महत्त्वाचा वाटा राखणाऱ्या आठ निर्मिती क्षेत्राने जानेवारी २०१४ मध्ये ३.७ टक्के वाढ नोंदविली होती.
तर डिसेंबर २०१४ मध्ये ती वाढ २.४ टक्के होती. सुधारित आकडेवारीनुसार, यंदाच्या जानेवारीतील प्रमुख आठ क्षेत्रातील वाढ ही गेल्या वर्षभरापेक्षाही किमान स्तरावरील आहे.
एकूण निर्मिती क्षेत्रामध्ये उपरोक्त प्रमुख आठ क्षेत्राचा हिस्सा हा ३८ टक्के आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेला आगामी पतधोरण निश्चित करताना याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी तिमाही पतधोरण येत्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आहे.
जानेवारी २०१५ मध्ये खनिज त९ल व नैसर्गिक वायूचे उत्पादन अनुक्रमे २.३ व ६.६ टक्क्य़ांनी रोडावले आहे. तर कोळसा व शुद्धीकरण उत्पादनांची वाढ अनुक्रमे १.७ व ४.७ टक्के झाली आहे.
एप्रिल ते जानेवारी दरम्यान प्रमुख आठ क्षेत्रातील वाढ ही ४.१ टक्के नोंदली गेली आहे. ती गेल्या आर्थिक वर्षांत याच कालावधीत ४ टक्क होती.

निर्मिती वाढ पाच महिन्यांच्या तळात
नवी दिल्ली : एचएसबीसीच्या अहवालाद्वारे जारी करण्यात येणारा भारत खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक फेब्रुवारीमध्ये गेल्या पाच महिन्यांच्या किमान स्तरावर नोंदला गेला आहे. देशातील कंपनी, उद्योग क्षेत्रातील गेल्या काही कालावधीत संथ हालचालींचा हा परिणाम असल्याचे निरिक्षण यानिमित्ताने विदेशी वित्तसंस्थेने नोंदविले आहे. अनेक कंपन्यांना या कालावधीत काम मिळाले नाही तर अनेकांनी या दरम्यान मनुष्यबळही कमी केले, असेही एचएसबीसीने आपल्या याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. वित्तसंस्थेच्या निर्देशांकानुसार फेब्रुवारी २०१५ मध्ये तो ५१.२ टक्के राहिला आहे. जानेवारीतील ५२.९ टक्क्य़ांवरून खाली येताना तो गेल्या पाच वर्षांतील किमान स्तरावर स्थिरावला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात यंदा निर्देशांक रोडावला आहे. निर्मिती क्षेत्रातील उत्पादन डिसेंबर २०१४ मध्ये दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर होते.