महागडे नव्हे तर सर्वसमावेशी संक्रमण!
सामान्यांना हसण्याचा हक्क देणारा ‘माय डेन्स्टिस्ट’ ध्यास
एसआरएल-फडकेज् लॅब : एकात्मिक, पारदर्शी ‘पॅथ’ सेवा
अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजांच्या बरोबरीनेच आरोग्य जपण्याला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले असले तरी आरोग्यसेवांचे महागडे रूप पाहता तो ऐपत असलेल्यांचा केवळ विशेषाधिकार बनलेला दिसतो. परंतु वैद्यकक्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, नव्या दमाच्या जिद्दीला मिळालेले कॉर्पोरेट पाठबळ आणि सेवेतील पारदर्शी-सुटसुटीतपणाने साधलेली किफायतशीरता यामुळे वैद्यक सेवांवरील ‘महागडे’ हे विशेषण पुसले जाऊन त्या सर्वसमावेशीही बनत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील डॉ. अविनाश फडके यांचे एसआरएल डायग्नोस्टिक्स, माय डेन्स्टिस्ट अथवा बंगळुरूतील क्लाऊड नाइन हे या धाटणीचे सध्या मोजके परंतु अनोखे प्रयोग ठरले आहेत.
शरीराच्या निगेत सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेल्या आणि अगदीच असह्य झाल्यास उपचाराकडे वळण्याची प्रवृत्ती असलेल्या दंतचिकित्सेत मुंबईसह पुण्यातून ‘माय डेन्स्टिस्ट’ क्लिनिक्सच्या संघटित शृंखलेतून वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या प्रयत्नाला आता चांगलीच फळे लागताना दिसत आहेत. मुंबईत ३४ तर पुण्यात २ असा सध्याचा ‘माय डेन्स्टिस्ट’चा पसारा हा दंतचिकित्सेत अनोखा असून, सर्वत्र अत्याधुनिक तंत्र व सामग्रीने सुसज्ज या क्लिनिक्स शृंखलेने सामाईक उपचारपद्धती आणि सामाईक दररचनेतून सेवानाविन्याचा नवा वस्तुपाठही घालून दिला आहे. अत्यंत वेळकाढू व वेदनादायी असलेल्या दातांच्या उपचारात गतिमानता, पारदर्शिता आणि मूळातच अल्पतम ‘मार्जिन’ ठेऊन मोठय़ा प्रमाणात रुग्ण हाताळणीतून साधलेले किफायती अर्थकारण हे ‘माय डेन्स्टिस्ट’ने अल्पावधीत कमावलेल्या यशाचे गमक ठरले आहे.
एप्रिल २०११ पासून आजतागायत ‘माय डेन्स्टिस्ट’ क्लिनिक्समध्ये कार्यरत १३० दंतचिकित्सकांनी दिवसा तीन पाळ्यांमध्ये काम करून तब्बल दीड लाख समाधानी ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. ‘स्माइल मोअर, पे लेस’ हे ब्रीद घेऊन या व्यवसायाचा पाया रचला गेला असल्याचे ‘माय डेन्स्टिस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम व्होरा यांनी सांगितले. ‘क्लिनिकमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाला उपचारापूर्वी त्याच्या दाताची नेमकी समस्या समजावून देऊन एकंदर खर्चाचा अंदाज देणे खूपच आवश्यक आहे. आम्ही व्यावसायिक नीतिमत्ता म्हणून हे तत्व अंगिकारले व जपलेही आहे,’ असे व्होरा सांगतात. प्रत्येक माय डेन्स्टिस्ट क्लिनिक म्हणूनच प्रारंभिक सल्लामसलत तसेच एक्स-रेसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही, क्लिनिक लब्ध-प्रतिष्ठितांचा निवास असलेल्या केम्प्स कॉर्नरमध्ये असो लालबागच्या कामगार वस्तीत असो आगामी उपचारासाठी वेबस्थळावर दिलेल्या सामाईक दररचनेपेक्षा एक पैसाही जास्त आकारला जात नाही आणि खर्चाची रुग्णाला आगाऊ जाणीव दिली जाते, या वैशिष्टय़ांचा त्यांनी खास उल्लेख केला.
आरोग्यसेवेचा पाया असलेल्या पॅथॉलॉजी क्षेत्रात फडके कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले डॉ. अविनाश फडके सध्या देशभरातील १०० शहरातील २०० लॅबॉरेटरीज्चा पसारा सांभाळत आहेत. आजच्या घडीला प्रत्यक्ष रुग्णावर उपचार सुरू होण्यापूर्वी रोगनिदानासाठी कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या म्हणजे ‘रोगापेक्षा भयंकर’ अशीच स्थिती आहे. डॉ. फडके सांगतात, ‘सर्वसाधारणपणे ७० ते ७५ टक्के वैद्यकीय उपचार हे पॅथॉलॉजी चाचण्यांच्या निदानावर अवलंबून असतात. म्हणून किमान गुणवत्ता असणारी पॅथ सेवा योग्य दरात सामान्य माणसांपर्यंत पोहचवायची झाल्यास या क्षेत्रात रुग्णालयांप्रमाणेच खासगी क्षेत्राच्या प्रवेशाशिवाय पर्याय नाही.’
पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात कॅन्सर पॅथॉलॉजी, मॉलेक्युलर पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी अथवा जेनेटिक्स या विविध शाखांमध्ये गेल्या १० वर्षांत नवीन तंत्रज्ञान एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आले आहे की, त्यासाठी आपल्याला नवीन भांडवल व तंत्रज्ञानाची गरज राहणारच, असे सध्या एसआरएल डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष (पॅथॉलॉजी) डॉ. फडके आवर्जून सांगतात. बडय़ा कॉर्पोरेटसह भागीदारीमुळेच बडी आर्थिक संसाधने व गुंतवणूक येऊ शकली आणि सर्व प्रकारच्या चाचण्या व निदान एकाच छताखाली आणणे, त्यासाठी विविध शाखांमधील तज्ज्ञ डॉक्टर्सचा सशक्त संघ बनविणे आणि परिणामी एकात्मिक व गुणवत्तापूर्ण सेवा तुलनेने कमी खर्चात देणे शक्य बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २००० मध्ये सर्वप्रथम पिरामल डायग्नोस्टिक आणि डॉ. अविनाश फडके लॅबॉरेटरीच्या भागीदारी प्रयोगाने देशभरात १० वर्षांत १०० लॅब्सचा पसारा फैलावला आणि २०१० मध्ये पिरामलच्या एसआरएल डायग्नोस्टिक्समधील विलिनीकरणातून हा पॅथ सेवेच्या विस्ताराला दुप्पट वेग मिळाला आहे.
उलाढालीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा औषधी उद्योग असलेल्या भारतात बहुसंख्यांक प्राथमिक वैद्यकसेवेपासून वंचित राहावेत हे दुर्दैवीच आहे. प्रश्न नुसता खर्चाचा नसून अधिकाधिक लोकांना वैद्यक विम्याचे संरक्षण प्रदान करण्याचाही आहे. खरी गरज ही हायटेक वैद्यकीय सेवांची नसून प्राथमिक रुग्णसेवा सुधारण्याची आहे आणि खासगी क्षेत्राला यात अजिबात रस नाही. तर सरकारची मदार ही अधिकाधिक खासगी क्षेत्राच्या योगदानावर आहे. पालिका व तत्सम स्थानिक प्रशासनाने मलेरिया, डेंग्यू, डायरियावर औषधोपचारांपेक्षा सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे नियोजन याकडे पाहायला हवे, असा डॉ. फडके यांचा आरोग्यस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे.
डॉ. फडके यांच्याप्रमाणेच ‘माय डेन्स्टिस्ट’ संबंधी विक्रम व्होरा यांनी पाहिलेल्या स्वप्नाला ‘सीड फंड’ या साहस भांडवल समूहाकडून झालेले प्राथमिक पालनपोषण व अर्थसहाय्यातून खऱ्या अर्थाने पंख फुटले. दंतचिकित्सालयांची इतकी मोठी शृंखला उभारण्यासाठी केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर व्यावसायिक अभिनिवेश, वृत्ती व जडणघडण, इतकेच काय ‘माय डेन्स्टिस्ट’ हे ब्रॅण्डिंग व त्याला साजेसा एकंदर परिवेष हे सारे ‘सीड फंड’कडून मिळालेल्या कानमंत्रानेच शक्य बनल्याचे विक्रम कृतज्ञतापूर्वक सांगतात. म्हणूनच स्थापनेच्या तिसऱ्या वर्षांत १०० चिकित्सालये आणि ३०० दंतचिकित्सकांचा मजबूत संघ उभारण्याचे नियोजनबद्ध धाडस ते करू पाहत आहेत.