चंद्रशेखरन यांच्याकडून गत निर्णयाचे समर्थन

आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्या संपादित करून दीघरेद्देशी व्यवसाय विस्ताराचे धोरण म्हणून केले गेलेले ब्रिटनमधील कोरस स्टील हस्तगत करण्याच्या निर्णयाभोवती वादाचे मोहोळ निर्माण केले जाणे गैर आहे, असे नमूद करीत त्या काळी घेतला गेलेला हा निर्णय व्यवसाय धोरण म्हणून उचितच होता, असे समर्थन टाटा स्टीलच्या अध्यक्षपदासह टाटा समूहाची धुरा सांभाळत असलेले एन. चंद्रशेखर यांनी मंगळवारी येथे केले.

टाटा स्टीलच्या ११०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे बोलताना, टाटा सन्समधील नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेत गत आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धाचा कालावधी आव्हानात्मक राहिला याची चंद्रशेखरन यांनी कबुली दिली. याच काळात कोरस स्टीलसह आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या काही संपादन व्यवहारांबाबत नाहक शंका उपस्थित केल्या गेल्या. आता मात्र त्या चर्चा निर्थक होत्या हे स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.

नवीन बाजारपेठांमध्ये शिरकाव, कच्चा मालाची उपलब्धता, तंत्रज्ञानात्मक सक्षमता मिळविण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या उत्पादन सामर्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास पावण्याचे धोरण हे समर्पकच होते, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये नॅटस्टील आणि थायलंडमध्ये मिलेनियम स्टीलवर ताबा मिळविल्यानंतर, या आंतरराष्ट्रीय विस्तारात ब्रिटनमध्ये कोरस ग्रुप पीएलसीवर ताबा हा नैसर्गिकरीत्या पुढचा टप्पा होता, अशा शब्दात त्यांनी भागधारकांपुढे त्या निर्णयाची कारणमीमांसा केली.

पारदर्शी निविदा पद्धतीतून, तत्कालीन संचालक मंडळाच्या अनेक बैठकांमधून विचारविमर्श आणि मंजुरीनंतरच संपूर्ण सहमतीनंतरच कोरसवरील ताब्याचे पाऊल टाकले गेले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टाटा समूहाकडून एप्रिल २००७ मध्ये कोरसच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तथापि २००८ मधील जागतिक वित्तीय संकटाच्या नकारात्मक परिणामाने युरोपातील औद्योगिक क्षेत्राच्या मुळावरच घाव घातला आणि अर्थातच कोरसच्या कामगिरीवरही विपरीत परिणाम साधला.