स्विडनच्या एरिक्सन कंपनीचे तंत्रज्ञान वापरावरून पेटंट नियम उल्लंघनात अडकलेल्या चिनी मोबाइल कंपनी शिओमीला तूर्त क्वालकॉमवर आधारित मोबाइल विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंपनीला गेल्याच आठवडय़ात याच न्यायालयाने महिनाभर मोबाइल विक्री न करण्याचे आदेश दिले होते. यानंतर कंपनीचे भारतातील उत्पादनही थांबविण्याचे धोरण जारी करण्यात आले होते. ई-कॉमर्स व्यासपीठावरूनही विक्री करण्यास कंपनीला प्रतिबंध करण्यात आला होता. आता मात्र कंपनीला ८ जानेवारीपर्यंत क्वालकॉम तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल फोन विकण्यास परवानगी दिली आहे. फ्लिपकार्टवर केवळ दर मंगळवारी शिओमीचे फोन उपलब्ध करून देणाऱ्या चिनी कंपनीला एक लाख मोबाइल विक्रीची अपेक्षा आहे. न्यायालयाने आता कंपनीला विक्री झालेल्या प्रत्येक फोनमागे १०० रुपये जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयात कंपनीची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिज्ञ कपिल सिब्बल मांडत आहेत.
मोठय़ा बॅटरी आयुर्मानाचे ‘फ्यूएल’ दाखल
भारतीय बनावटीच्या लावा कंपनीने आयरिस फ्यूएल ६० हा नवा स्मार्टफोन तयार केला आहे. अधिक काळ चालणाऱ्या बॅटरीचा समावेश करण्यात आलेल्या कंपनीचा हा दुसरा स्मार्टफोन कंपनीचे उपाध्यक्ष नवीन चावला यांनी मंगळवारी नवी दिल्लीत सादर केला. पाच इंच स्क्रीन, १जीबी रॅम आणि ८जीबी अंतर्गत मेमरी असलेल्या या फोनला १०एमपी व २एमपी असे दोन कॅमेरे आहेत. ८,८८८ रुपये किंमत असलेल्या या फोनची बॅटरी २जी तंत्रज्ञानावर ३२ तासपर्यंत चालू शकते. तसेच ३.१५ तास चार्जिग करण्याचीदेखील सुविधा यात आहे. लावा कंपनीचा भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत ६ टक्के हिस्सा आहे.