गुंतवणूकदारांचे पैसे अन्य योजनांमध्ये वळविले प्रकरणात सध्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सहारा‘श्री’ सुब्रता रॉय यांना एका प्राप्तीकर प्रकरणात हजर राहण्याचे आदेश मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले.

सहारा समूहातील सहारा इंडिया कमर्शिअल कॉपरेरेशन लिमिटेडने २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील प्राप्तीकर विवरण पत्र भरले नसल्याच्या प्रकरणात रॉय यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले.
रॉय यांच्यासह कंपनीचे दोन संचालक जे. बी. रॉय व रनोज दास गुप्ता यांनीही हजर रहावे, असे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी देवेंद्र कुमार शर्मा यांनी म्हटले आहे.
या दोन संचालकांनी न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक असताना ते हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांच्यासह रॉय यांच्यावर समन्स बजाविले. रॉय तुरुंगात असलेल्या तिहारच्या निरिक्षकांशी सल्ला मसलत करून उपरोक्त तिघांना १५ एप्रिल रोजी हजर राहण्याबाबत आदेश जारी करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कंपनीचे आणखी एक संचालक ओ. पी. श्रीवास्तव यांनी वैयक्तिक कारणासाठी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितल्याने त्यांचा अर्ज न्यायालयाने ग्राह्य़ धरण्यात आला. या प्रकरणात प्राप्तीकर विभागाने १३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. विहित वेळेत प्राप्तीकर विवरण पत्र न भरल्याचा ठपका कंपनीच्या संचालकांवर ठेवण्यात आला आहे.