एखादा पती खूप कमावत आहे म्हणून पत्नीच्या वेतनावर कुटुंबिय अवलंबून नसते, हे म्हणणे चुकीचे असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने ‘न्यू इंडिया अॅशुरन्स’ला सांगली येथील सुनील गरुड (५२) आणि त्यांच्या मुलांना नुकसान भरपाई म्हणून ४७ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम सात टक्के व्याजाने देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गरुड यांची पत्नी उज्ज्वला (४५) यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता.
गरुड हे सरकारी नोकरदार असून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या पत्नीपेक्षा ते अधिक कमावतात. त्यामुळे ते तिच्या पैशांवर अवलंबून नव्हते, असा अजब दावा कंपनीने करून गरुड यांच्या नुकसान भरपाईच्या मागणीला विरोध केला होता. मात्र न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठाने कंपनीचा हा दावा फेटाळून लावत गरुड आणि त्यांच्या मुलांना भरपाईचे आदेश कंपनीला दिले. एवढेच नव्हे, तर सध्याच्या काळाचे राहणीमान पाहता पती-पत्नी दोघांचे वेतन हे घर चालविण्याच्या दृष्टीने सारखेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पती-पत्नीपैकी हयात असलेला एकजण खूप कमावता आहे आणि त्याला आर्थिकदृष्टय़ा परावलंबनाची गरज नाही असे म्हणणे चूक आहे. उलट दोघेही कमावत असतील तर घर चालविण्यासाठी येणारा आर्थिक खर्च ते वाटून घेतात, असे नमूद केले.