नव्या २०७१ संवत्सराची सुरुवात, म्हणजे दिवाळीत लक्ष्मीपूजनानिमित्त गुरुवारी बाजारात होणाऱ्या मुहूर्ताच्या सौद्यांना खरेदीची प्रथा सध्याच्या डिजिटल युगातही अनेकांकडून पाळली जाते. दोन्ही निर्देशांक त्यांच्या सार्वकालिक उच्चांकासमीप आणि गेल्या दिवाळीपासून आजतागायत २५ टक्क्य़ांहून अधिक परतावा देणारी कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर यंदाची दिवाळी ही गुंतवणूकदारांसाठी खासच म्हणायला हवी. ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्रातील नव्या सरकारकडून महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी रेटा पाहता, आगामी काळाच्या उज्ज्वलतेची गुंतवणूकदारांना मिळालेली जणू हमीच आहे. पण भाव वरच्या पातळीवर असताना खरेदीत जोखीमही असतेच. पण विविध आघाडीच्या दलाली पेढय़ांनी मुहूर्ताच्या खरेदीचे अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणूकदारांच्या दिवाळीतील समभागांची निवड सोपी केली आहे. दलाली पेढय़ांच्या या शिफारशी आणि वर्षभरासाठी त्यांनी सुचविलेले भावाचे लक्ष्य यांचा हा वेध..