केड्राईच्यावतीने आयोजित ‘शेल्टर २०१४’ प्रदर्शनात शहर व परिसरात किमान १५ लाखापासून ते कमाल तब्बल तीन कोटी रुपये किंमतीपर्यंत सदनिका उपलब्ध असल्याचे पुढे आले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत १५ हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली. आतापर्यंत १०० हून अधिक सदनिकांची नोंदणी झाली आहे. या प्रदर्शनामुळे नाशिकच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रावर दाटलेले मंदीचे मळभ दूर झाल्याची बांधकाम व्यावसायिकांची प्रतिक्रिया आहे.
येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर सुरू झालेल्या शेल्टर गृह प्रदर्शनात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. शहराचा वाढता विस्तार, सुवर्ण त्रिकोणातील वाढते महत्व, चारपदरी रस्ते यामुळे मुंबई व पुण्यानंतर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिक अग्रस्थानी आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले.
१२० बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला असून ५०० गृह प्रकल्पासंदर्भात सर्व प्रकारची माहिती दिली जात आहे. याशिवाय १५ वित्तीय संस्था, १०० गृह व बांधकाम साहित्य पुरवठा करणारे व्यावसायिकही प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात पहिल्या दोन दिवसात १५ हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनात सर्व आर्थिक स्तरासाठी सदनिका उपलब्ध आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात किमान १५ लाखापासून तीन कोटी रुपयांपर्यतच्या सदनिका प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांनी विविध आकर्षक योजनाही सादर केल्या आहेत. पहिल्या दोन दिवसात १०० हून अधिक सदनिकांची नोंदणी झाल्याचेही ते म्हणाले. ‘रेडी रेकनर’ व अन्य काही कारणांमुळे मागील वर्षांत या क्षेत्रात काहिसे मंदीचे मळभ होते. प्रदर्शनातील उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आशादायक वातावरण निर्माण झाल्याचे निमाश डेव्हलपर्सचे संचालक शंतनु देशपांडे यांनी सांगितले. प्रदर्शनात सहभागी झालेल्या बहुतांश बांधकाम व्यावसायिकांची ही प्रतिक्रिया आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रवेशव्दार गृह प्रकल्पाचा आब राखून असल्याने येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शन २१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार असून नाशिककरांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.