नोटांच्या दुष्काळाच्या चटक्यांनी सर्वसामान्य भारतीय होरपळत असताना पर्यटन व्यवसायात अग्रणी असलेल्या थायलंडलासुद्धा त्याचा फटका बसला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी अशा येथील मुख्य हंगामात प्रमुख पर्यटन स्थळांवर भारतीयांची उणीव तीव्रतेने भासत आहे.

सध्या चलन महासंकटाचा सामना करीत असल्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असलेल्या महिन्यांत भारतवासी अभावानेच आढळून येतात. भारतीय पर्यटकांसाठी बाजारहाट, लैंगिक पर्यटन, मसाज यासाठी आकर्षण असलेल्या बँकॉक आणि पट्टाया या दोन शहरांमध्ये ही स्थिती आहे. तुरळक परदेशी पर्यटकांच्या बळावर येथील व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि पर्यटन हंगामातही हॉटेल्सचे भाव मात्र वधारलेले नाहीत, अशी माहिती बँकॉकमधील हॉटेल व्यावसायिक राजीव जैन यांनी दिली.

थायलंडमध्ये १ डिसेंबरपासून पर्यटनाला बहर सुरू होतो व तो फेब्रुवारी अखेपर्यंत असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे दोन हजार बाट (थाई चलन) हे व्हिसा शुल्क या काळात पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी अध्र्यावर आणले जाते. गोव्याप्रमाणे लाभलेला पट्टायाचा नैसर्गिक समुद्रकिनारा आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून नावलौकिक असलेले बँकॉक हे युरोपियन आणि आशियाई राष्ट्रांच्या पर्यटनाचे गेल्या काही वर्षांत प्रमुख आकर्षण झाले आहे. पर्यटन स्थळांचे दर्शन, स्वस्तातील बाजारहाट, वगैरे उद्दिष्टे ठेवून हे पर्यटक इथे मोठय़ा संख्येने येतात. यात मोठा भरणा हा भारतीयांचा असतो. मात्र पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे आणि बँकांमधून पैसे काढण्याची बंधने कडक असल्यामुळे थायलंडमधील पर्यटन उद्योगावर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पर्यटन स्थळे, मसाज पार्लर, खाद्यपदार्थाचे आणि निवासी हॉटेल्स या ठिकाणी भारतीय पर्यटक अभावानेच दिसत आहेत.

सर्वसाधारणपणे भारतीय पर्यटक मोठय़ा उत्साहाने येथे येतात. पण नोटांबाबतच्या निर्णयामुळे भारतीयांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा आमच्या देशातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. राजीव जैन, हॉटेल व्यावसायिक

भारतीय पद्धतीचे जेवण आम्ही पर्यटकांना उपलब्ध करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे हीच मंडळी आमच्याकडे येतात. मात्र मोदी यांच्या निर्णयामुळे आमचा धंदा मंदीत सुरू आहे.  रवींद्र शाह, हॉटेल व्यावसायिक