मोबाइल अ‍ॅपही असुरक्षित असल्याचे तज्ज्ञाचे मत

देशातील किरकोळ विक्री क्षेत्र हे बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रानंतरचे सायबर हल्ल्यांद्वारे सर्वाधिक सावज मिळविणारे क्षेत्र ठरले  आहे, असे निरीक्षण येथे सुरू असलेल्या ‘इंडिया रिटेल फोरम २०१६’ नावाच्या परिसंवादामध्ये उपस्थित तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. डाऊनलोड केल्या जाणाऱ्या एकूण मोबाइल अ‍ॅपपैकी ९२ टक्के अ‍ॅप हे सायबर हल्ल्यांना सहजरीत्या बळी पडतील, असे असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे.

मुंबई बुधवारपासून सुरू असलेल्या किरकोळ विक्री क्षेत्रावरील परिषदेचा समारोप गुरुवारी झाली. या मंचावर ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या किरकोळ विक्री व ग्राहकोपयोगी वस्तू व्यवहार विभागाचे अनुराग माथुर यांनी नमूद केले की, या क्षेत्रावरील वाढते सायबर हल्ले रोखण्यासाठी संकेतस्थळ तसेच अ‍ॅपच्या साहाय्याने वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी. किरकोळ विक्री क्षेत्रातील माहितीची गुप्तता राखणे व माहितीचे संरक्षण करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत असून या क्षेत्रातील अधिक प्रमाणातील खरेदी ही मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून होत आहे.

खरेदी सुलभरीत्या व्हावी यासाठी अनेकदा ग्राहक संबंधित कंपनीचे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करतात. या अ‍ॅपपैकी ९२ टक्के अ‍ॅप हे सायबर हल्ल्यांना सहजरीत्या बळी पडतील अशी आढळून आली आहे.

परिषदेला या क्षेत्रातील देश – विदेशातील १,३०० सदस्य उपस्थित होते.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे किरकोळ विक्री दुकानांचे अस्तित्व कमी झाले असल्याचे यंदाच्या किरकोळ विक्री परिषदेचे अध्यक्ष व ‘वॉलमाट इंडिया’चे मुख्य कार्यकरी अधिकारी क्रिश अय्यर यांनी सांगितले.

अमेरिकेत २०१४ मध्ये झालेल्या एकूण विक्रीपैकी ४९ टक्के विक्रीवर डिजिटल तंत्राचा दबाव होता. यामध्ये वाढ होऊन २०१५ मध्ये एकूण खरेदीच्या ६४ टक्के डिजिटल तंत्राच्या साहाय्याने झाली.

यापुढील काळात रिटेल व्यापार करताना या क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या खर्चाची पुनर्रचना करावी लागणार आहे. कामकाज खरेदी, मालवाहतूक, भाडे, महसूल या सर्वासाठी योग्य ती रचना नव्याने करावी लागेल याकडेही अय्यर यांनी लक्ष वेधले.