‘टाटा’ नसलेले सायरस मिस्त्री दुसरे, तर १५० वर्षांंतील सहावे अध्यक्ष वयाच्या पन्नाशीच्या आत टाटा समूहाचे अध्यक्षपद आपल्याकडे दीर्घकाळ ठेवण्याची कारकिर्द सायरस मिस्त्री यांना मात्र राखता आली नाही. अध्यक्षपदाची पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिस्त्री यांना थेट समूहातूनच बाहेर जावे लागले. मिस्त्री यांना तीन वर्षे १० महिन्यांचा कालावधी मिळाला.

टाटा नाव नसलेले मिस्त्री हे दुसरे अध्यक्ष होते. यापूर्वी नौरोजी साकलतवाला हे अध्यक्ष होते. मिस्त्री यांच्याप्रमाणेच साकलतवाला यांनाही अध्यक्ष म्हणून कमी कालावधी मिळाला. १९३८ मध्ये निधन झालेले साकतवाला हे टाटा समूहाचे सहा वर्षे अध्यक्ष होते.

काळजी व्यक्त केली होती; पण..

२०१५-१६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सायरस मिस्त्री यांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. टाटा सन्सच्या सभामंचावरून ‘आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे’ असे जाहीर केले होते. आंतरराष्ट्रीय बिकट व्यवसायामुळे समूहावरही विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र तुलनेत तसे कठोर निर्णय मिस्त्री यांच्याकडून घेतले गेले नाही, असे चर्चिले जाते.

मिस्त्रीही मितभाषीच

दीडशे वर्षांपासून विविध क्षेत्रात वर्चस्व असलेल्या टाटा समूहात मिस्त्री हे अध्यक्ष म्हणून रुजू झाल्यानंतरही रतन टाटा यांच्याप्रमाणेच तेही मितभाषी असल्याचे संपर्कात येणाऱ्या उद्योगपती, कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जाणवत होते. प्रत्यक्ष कृतीवरच आपला भर असल्याचेही ते वेळोवेळी स्पष्ट करत. उत्पादन सादरीकरणासही ते क्वचितच दिसत.

गेल्या दीडशे दशकातील सायरस मिस्त्री हे टाटा समूहाला लाभलेले सहावे अध्यक्ष आहेत. समूहातील अध्यक्षपद कारकिर्दीत सर्वाधिक कालावधी सायरस मिस्त्री यांना लाभला आहे.