डी-मार्ट भागविक्रीत गुंतवणूकदारांना दुपटीने परतावा

निश्चलनीकरण मोहिमेनंतर भांडवली बाजाराला यशस्वीरीत्या आजमावून तब्बल १०५ पटींनी विक्रमी भरणा पूर्ण करणारी भागविक्री आणि बाजारातील सूचिबद्धतेलाच दुप्पट भावावर व्यवहारांना सुरुवात, अशी अद्वितीय किमया मंगळवारी लोकप्रिय किरकोळ विक्री दालन-शृंखला ‘डी-मार्ट’ची प्रवर्तक कंपनी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या समभागांनी साधली. १,८७० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करणाऱ्या अन्य  कोणत्याही कंपनीच्या समभागांनी पदार्पणालाच शतकी खेळी करण्याचा हा बाजारातील पहिलाच प्रसंग आहे.

डी-मार्टच्या समभागांची प्रत्येकी २९९ रुपये किमतीला खुली प्रारंभिक विक्री आठवडय़ापूर्वी (८ ते १० मार्च दरम्यान) पार पडली. मंगळवारी या समभागांचे भांडवली बाजारात सूचिबद्धतेला १०२.१४ टक्के वाढीसह ६०४.४० रुपये पातळीवर व्यवहार खुले झाले. दिवसातील व्यवहारात विक्री किमतीच्या तुलनेत ११७.३९ टक्के वाढीसह प्रत्येकी ६५० रुपयांच्या उच्चांकापर्यंत समभागाने मजल मारली. तर दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात ६४०.७५ रुपये या पातळीवर या समभागाचा भाव स्थिरावला. म्हणजे भागविक्रीला अर्ज करणाऱ्या आणि कंपनीचे समभाग मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना आठवडय़ाभरात या समभागाने ११४.२९ टक्क्यांचा लाभ मिळवून दिला आहे.

अलीकडच्या काळातील ही एक सर्वात मोठी भागविक्री करणारी कंपनी आणि त्याहून दमदार सूचिबद्धता मिळविणारा समभाग असे या घटनेचे वर्णन नि:संशय करता येईल, असे मत सॅम्को सिक्युरिटीजचे मुख्याधिकारी जिमीत मोदी यांनी केले. नोटाबंदीपूर्वी ऑक्टोबरमध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या ३,००० कोटींच्या भागविक्रीला १०४ पटींच्या घरात भरणा झाला, त्या आधी अ‍ॅडव्हान्स एन्झायमच्या भागविक्रीला ११६ पटींनी, तर क्वेस कॉर्पच्या भागविक्रीला १४५ पटींनी भरणा झाला आहे. मात्र १०५ पटींनी विक्रमी भरणा करणाऱ्या भागविक्रीपश्चात १०० टक्क्यांहून अधिक सूचिबद्धतेलाच लाभ देणारी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टची कामगिरी विरळाच आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

अभूतपूर्व कामगिरी..

दीड हजार कोटींहून अधिक भांडवल उभे करणाऱ्या अन्य कोणत्याही कंपनीने सूचिबद्धतेला १०० टक्क्यांहून अधिक लाभ गुंतवणूकदारांच्या पदरी आजवर पाडलेला नाही. त्यामुळे अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या समभागांची कामगिरी भारताच्या भांडवली बाजाराच्या इतिहासात अभूतपूर्वच आहे. यापूर्वी मॅक्स अलर्ट्स सिस्टम्स या कंपनीच्या समभागांनी सूचिबद्धतेला गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांच्या घरात लाभ जरूर दिला आहे; परंतु मॅक्स अलर्ट्स ही तुलनेने अत्यंत छोटी कंपनी आणि तिची भागविक्री अवघा ८ कोटी रुपयांची होती. तर अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने खुल्या विक्रीतून १,८७० कोटी रुपये उभारले आहेत. अलीकडे गुंतवणूकदारांना भरभरून लाभ देणाऱ्या मोजक्या बडय़ा भागविक्रींमध्ये मुंद्रा पोर्ट अ‍ॅण्ड एसईझेड (७५ टक्के), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (६३.४६ टक्के), मॉइल लिमिटेड (४६.९३ टक्के), अल्केम लॅबोरेटरीज (३१.४३ टक्के), इक्विटास होल्डिंग्ज लि. (३०.९१ टक्के), महानगर गॅस लि. (२८.२६ टक्के) यांचा समावेश करता येईल.