ऐन महागाईच्या काळात महिन्याभरात किलोला २०० रुपयांवर गेलेल्या एकूणच तूर डाळीच्या व्यवहारांवर भांडवली बाजार नियामक यंत्रणेची नजर असून काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा वायदा बाजाराशी असलेला संबंधही तपासला जाण्याचे संकेत सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सोमवारी येथे दिले.
देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारातर्फे (एनएसई) आयोजित ‘इटीएफ’ परिषदेच्या मंचावरून ते बोलत होते. यावेळी बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण तसेच यूटीआय म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिओ पुरी हेही उपस्थित होते.
अल्पावधीतच तूरडाळीचे दर गगनाला भिडल्यानंतर देशभरात करण्यात आलेल्या कारवाईंतर्गत आतापर्यंत ७५,००० टनहून अधिक विविध डाळ जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तर आयात डाळीच्या मर्यादेपेक्षा (३५० टन) अधिक साठेबाजीवरही नियंत्रण आहे. महिन्याभरापूर्वीच वायदा बाजाराचे नियमन सेबीच्या अखत्यारित आले असल्याने आता वायदा वस्तूंबाबतचे व्यवहारही सेबीच्या नियंत्रणात आले आहेत.
सेबी अध्यक्ष सिन्हा यांनी सोमवारी या मंचावरून एकूणच या विषयाला थेट हात घातला. डाळींच्या साठेबाजीवर सेबीचे लक्ष असून कारवाईतील धान्यांचा वायदा बाजारात व्यवहार होत असल्यास ही बाब गंभीरतेने घेतली जाऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत आपण परिस्थिती न्याहाळत असून प्रसंगी सरकारबरोबरही चर्चा करण्याची तयारी सिन्हा यांनी दर्शविली.
काळ्या बाजारात येणाऱ्या धान्याचा वायदा बाजारातील व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद करून सिन्हा यांनी अत्यावश्यक वायदा वस्तू अटींनुसार त्याचे उल्लंघन होत असेल तर त्याबाबतच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, असे सिन्हा यांनी सांगितले. डाळींच्या दरवाढीला वायदा बाजार कारणीभूत असल्याचे मत चुकीचे असल्याचे समर्थनही त्यांनी केले.
इटीएफबाबत नियम बदलण्यास सेबी तयार
इटीएफ (एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड) या गुंतवणुकीच्या पर्यार्यात अधिक पारदर्शकता येण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांमध्ये बदल करण्याची नियामक यंत्रणेची तयारी असल्याचे विधान सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी या विषयावरील एक दिवसीय परिषद मंचावरून केले. एक वित्तीय उत्पादन म्हणून इटीएफसाठीची नियमावली अधिक सुलभ करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केली. उत्कृष्ट वित्तीय पर्याय असलेल्या इटीएफमधील नाविन्यतेबाबत काळजी घेण्याची स्थिती असून या माध्यमातून गुंतवणूकदारांची जोखीम कमी होण्यास हातभार लागायला हवा, असेही ते म्हणाले.
इटीएफ बाजारपेठ
एक लाख कोटींच्या उंबरठय़ावर
देशातील इटीएफ हा गुंतवणूक पर्याय लवकरच एक लाख कोटी रुपयांचा होण्याची आशा यावेळी चित्रा रामकृष्ण यांनी व्यक्त केली. एनएसई भांडवली बाजाराचा मोठा हिस्सा राखणाऱ्या इटीएफकरिता येत्या पाच वर्षांत आणखी काही विशेष निर्देशांक सादर करण्याच्या तयारीत असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी, इटीएफ ही बाजारपेठ गेल्या एका तपात १२ पटीने वाढल्याचे नमूद केले. इटीएफमध्ये तब्बल ९७ टक्के बाजारहिस्सा असलेली एनएसई या गटात सर्वात जुना व अव्वल मंच आहे. भारतात ११ समभाग निगडित (निफ्टी५०) इटीएफ आहेत.