ताज्या अहवालाप्रमाणे जानेवारी ते मार्च तिमाहीत विकले गेलेले ३४.२ टक्के टॅबलेट्सचे हे डेटाविंडचे असल्याचे आढळून आले. डेटाविंडच्या या बाजार वरचष्म्याने सॅमसंग आणि लेनोव्हो या बडय़ा नाममुद्रांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. सॅमसंगचा बाजारहिस्सा खूप खाली २०.९ टक्के असल्याचे ‘आयडीसी’ व सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)च्या पाहणीने स्पष्ट केले आहे.
सीएमआरच्या पाहणीने तर ५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॅबलेट प्रकारात डेटाविंडचा बाजारहिस्सा ७४.४ टक्के असल्याचे सांगितले. या वर्गवारीतील टॅबलेट्सची बाजारपेठ भारतात सर्वात वेगाने म्हणजे एकूण बाजाराच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी वाढली असल्याचे ही पाहणी सांगते.
डेटाविंडचे हे किफायती टॅबलेट हे एक वर्षांच्या मोफत वेब जोडणीसह येत असल्याने त्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे डेटाविंडचे अध्यक्ष व मुख्याधिकारी सुनीत सिंग टुली यांनी सांगितले. अनेक भारतीयांसाठी हे इंटरनेटशी तोंडओळख होण्याचे एकमेव सुलभ साधन बनले असल्याचा त्यांनी दावा केला.

सॅमसंगकडूनही अव्वलतेचा दावा
कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक्स अग्रणी सॅमसंगने मात्र आयडीसी-सीएमआरच्या या पाहणीच्या निष्कर्षांबद्दल दुमत व्यक्त करताना, त्यांचे भारतातील अग्रणी स्थान कायम असल्याचा दावा केला. यासाठी जीएफके डेटा या दुसऱ्या बाजार सर्वेक्षणाचा हवाला कंपनीने दिला आहे. जीएफके डेटाच्या मते सॅमसंगचा टॅबलेट्समधील बाजारहिस्सा सरलेल्या तिमाहीत ३७.९ टक्क्यांवरून ३८.५ टक्के असा वाढला आहे. या पाहणीत, मायक्रोमॅक्स आणि अॅपल अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर, तर डेटाविंडला पहिल्या तिनांत स्थानही नाही.