• एकूण बाधित कार्डे ३२.५० लाख
  • यापैकी २६.५० लाख कार्डे व्हिसा आणि मास्टरकार्डची
  • सहा लाख रुपेकार्डाचा यात समावेश

मे, जून व जुलै असे गत तीन महिने बँकांची, त्यांच्या डेबिट कार्डधारकांची माहिती चोरी करून पैसे काढले गेल्याचे निष्पन्न होत आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठय़ा कार्ड माघारी घेण्याच्या नामुश्कीनंतर आता या घटनेच्या खोलात रिझव्‍‌र्ह बँकेसह अन्य तपास यंत्रणा जाऊ पाहत आहे.

स्टेट बँकेसह १९ हून अधिक राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांच्या ३२ लाख डेबिट कार्डधारकांची माहिती चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्डधारक संबंधित बँकेऐवजी अन्य बँकांच्या ९० एटीएममधून व्यवहार करताना अमेरिका, चीनमधून माहिती चोरीला गेल्याचा संशय आहे.

व्हिसा आणि मास्टरकार्डला ‘रुपे’द्वारे समर्थ पर्याय प्रस्तुत करणाऱ्या ‘एनपीसीआय’च्या माहितीनुसार, बाधित ३२.५० लाख डेबिट कार्डापैकी ६४१ ग्राहकांच्या खात्यातून १.३० कोटी रुपये काढले गेल्याचे स्पष्ट होत आहे. तर बाधित कार्डाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ०.०५ टक्के आहे, असा दावा सरकारने गुरुवारी केला होता.

एकूण घटनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत असून तो आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. अहवाल प्राप्तीनंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सायबरजगतात अशा घटना नित्याच्या असतात; मात्र त्याचा मागोवा घेणेही सहजशक्य आहे, असे केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

हिताची पेमेंट सव्‍‌र्हिसेस या एटीएम तयार करणाऱ्या कंपनीच्या त्रुटीमुळे बँकांच्या डेबिट कार्डाची माहिती चोरीला गेल्याचा संशय आहे. याबाबत खासगी क्षेत्रातील आघाडीच्या येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांनी गुरुवारी आक्षेप नोंदविला होता.

चोरटे पकडणे सहज शक्य : सरकार

  • विविध बँकांची ३२ लाख डेबिट कार्डाबाबतची माहिती ‘हॅक’ झाली असली तरी काळजीचे कारण नाही, असा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी याबाबत सविस्तर माहिती घेत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. बँकांबाबतची माहिती कॉम्प्युटरच्या माध्यमातून चोरीला गेली असून तिचा छडा लावणे सहज शक्य आहे; तेव्हा बँक ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

सर्वच बाजूंनी तपासाला वेग..

  • बँकांच्या ग्राहकांची माहिती चोरीला गेल्यानंतर उद्भवलेल्या समस्येवर आता विविध स्तरावर चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या सायबर सेलने बँकांकडून माहिती मागविली आहे. संबंधित बँकांना ईमेल पाठवून ही माहिती मागविण्यात आल्याचे सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर रिझव्‍‌र्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशनही कार्डबाधित बँकांकडून तपशील मागवीत आहेत.