यंदा कमी पाऊस पडला तर अन्नधान्याच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त करतानाच प्रसंगी किमती कमी राहण्यासाठी वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याच्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
अन्नधान्याच्या किमती वाढण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास किमान होण्याची शक्यता वर्तवितानाच अर्थ सचिव राजीव मेहेरिषी यांनी यंदा चांगला मान्सून व अन्नधान्याच्या किमती स्थिर राहण्याबाबत आशा व्यक्त केली आहे.
यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे. याबाबत मेहेरिषी म्हणाले की, कमी मान्सूनचा परिणाम केवळ अन्नधान्याच्या उत्पादनावरच होणार नाही; तर वस्तूंच्या नियमित पुरवठय़ावर लक्ष देण्याची गरज आहे.
कमी मान्सूनमुळे महागाई वाढणार नाही काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, यंदा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी अन्नधान्याच्या एकूणच किमती या स्थिर राहतील. ग्रामीण भागातील आर्थिक विकासावर याचा अधिक परिणाम दिसण्याची चिन्हे असून या भागात कदाचित वस्तूंच्या किमती वाढू शकतील. अन्नधान्यांचे दर कमी मान्सूनअभावी वाढू नयते यासाठी सरकार त्याच्या नियमित पुरवठय़ाची यंत्रणा सज्ज करीत असल्याचेही ते म्हणाले. यासाठी मेहेरिषी यांनी सरकारच्या गेल्या वर्षीचा दाखला दिला. त्या वेळी भांडारगृहातून तांदूळ, गव्हासारख्या जिनसांचा नियमित पुरवठा करण्यात येऊन किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला, असेही ते म्हणाले. याचबरोबर किमतीतील मूल्य अस्थिरता रोखण्यासाठी कांदे-बटाटा यांच्या निर्यातीला प्रतिबंद घालण्यात येऊन डाळी तसेच खाद्यतेलांची आयातीवर र्निबध घालण्यात येतील, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्नधान्याच्या वस्तूंच्या किमतींमध्ये सध्या घसरण दिसून येत असून स्थिर रुपयामुळे आयात तुलनेत कमी महागडी व निर्यातीला काहीसा निरुत्साह प्राप्त होत आहे, असेही ते म्हणाले. मेहेरिषी यांनी देशाच्या विकासदराबाबत, येत्या १० ते १५ वर्षांमध्ये ८.५ ते ९ टक्क्यांचा अंदाज व्यक्त केला.