बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचे अनुमान
भारतीय अर्थव्यवस्थेचा विद्यमान आर्थिक वर्षांतील प्रवास संथच राहील आणि अपेक्षित उभारी लांबेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेतील मलूलतेबरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेने उशिराने केलेली व्याजदर कपात कारणीभूत असल्याचे तिने नमूद केले आहे.

केंद्रात बहुमताचे स्थिर सरकारमुळे नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेत काहीशी स्थिरता आली तर भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असे अमेरिकी वित्तसंस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांचा पवित्रा येत्या कालावधीतही सावधच असावा, असेही तिने सुचविले आहे.

२०१५-१६ चे पहिले अर्ध आर्थिक वर्ष संपुष्टात आले आहे. अनेक कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही जाहीर झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर उर्वरित अर्ध वित्त वर्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेबाबत वित्तसंस्थेने फार अपेक्षा व्यक्त केली नाही.
जागतिक अर्थव्यवस्थेत येत असलेला सुधार व रिझव्‍‌र्ह बँकेची दर कपात या दोन्ही बाबी काहीशा उशिराने झाल्या असून त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम जाणवण्यास वेळ लागू शकतो, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे.
पुढील वर्षभरात ग्राहकांकडून होणारी मागणीतील वाढ भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देईल, असे स्पष्ट करत वित्तसंस्थेने यासाठी स्वस्त कर्ज दर, सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारा सातवा वेतन आयोग, घरगुती बचत, खनिज तेलाचे कमी दर आणि गव्हाच्या संभाव्य आधारभूत किमती ही कारणे दिली आहेत.

कोणत्याही ठरावीक आर्थिक सुधारणांच्या तुलनेत बँकांकडून होणारे कर्ज व्याजदर कपातीसारखे उपाय प्रत्यक्षात अर्थविकासासाठी ५ ते १० वर्षे घेतात, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. दरम्यान, वित्तसंस्थेने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताचा विकास दर आधीच्या ६ टक्के अंदाजावरून ५.५ टक्के असेल, असे म्हटले आहे.