शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबरच त्यात पारदर्शकता आणि गतिमानता  आणणाऱ्या ‘डिमॅट’ संकल्पनेबाबत सामान्यपणे दिसणाऱ्या गैरधारणा  आणि त्यांची उत्तरे..
* बँक खाते व डिमॅट खाते यात साम्य आहे तर मग बँक देते त्याप्रमाणे डिमॅट खात्यातील जमा सिक्युरिटीजवर डिपॉझिटरी व्याज का देत नाहीत?
– बँक तुमचे पसे वापरते (दुसऱ्याला कर्ज देते). डिपॉझिटरी तुमच्या खात्यातील सिक्यरिटीज वापरत नाही; तर फक्त ते सांभाळून ठेवते.
* बँक खात्याप्रमाणे डिमॅट खाते ऑपरेट करताना दोनपकी एका खातेदाराची सही पुरेशी का नसते काय?
– डिपॉझिटरी ही कंपनी कायदा आणि डिपॉझिटरी कायदा याद्वारे नियंत्रित असल्याने त्यासाठीची नियमावली वेगळी आहे. ज्या अन्वये सर्व खातेदारांनी सह्या करणे आवश्यक असते.
* डिलिव्हरी सूचना पत्राबाबत तपशील सांगता येईल का? तशी सूचना न दिल्यास काय होते?
– डिलिव्हरी सूचना पत्र म्हणजे बँकेने दिलेले चेक बुकच होय! आपल्या खात्यातून शेअर डेबिट करून अन्य खातेदाराच्या खात्यात ते क्रेडिट करण्याचा आदेश डीपीला डिलिव्हरी सूचना पत्राद्वारे दिलेला असतो. शेअर दलालामार्फत शेअर्स विकले असतील व डिलिव्हरी सूचना पत्र दिले नाही तर शेअर्स लिलावाद्वारे ते भांडवली बाजार खरेदी करेल व अतिरिक्त पसे तुमच्याकडून वसूल केले जातील
* सेबीचे सीडीएसएलवर नियंत्रण आहे का?
– होय. डिपॉझिटरीज पूर्णत: सेबीच्या नियंत्राणाखाली कार्यरत असतात.
*  जी कंपनी भांडवली बाजारात नोंदणीकृत नसेल त्यासाठी डिमॅट होऊ शकते का?
– होय. तथापि जी कंपनी सूचिबद्ध नसते त्या कंपनीचे शेअर डिमॅट करण्याची सोय उपलब्ध करून देणे हे संबंधित कंपनीवर बंधनकारक असते.
*  करपात्र नसलेली व कर विवरणपत्र न भरणारी व्यक्ती डिमॅट खाते उघडू शकते का?
– होय. त्याबाबत कोणतेही बंधन नाही.
* डिमॅट शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खाते सुरू करावे लागते का? सीडीएसएलशी संलग्न ट्रेडिंग खाते सुरू करता येते का?
– शेअर्सची खरेदी – विक्री हा स्वतंत्र व्यवहार झाला. त्यानंतर डिलिव्हरी देतेवेळी डीपीचा (डिपॉझिटरी) संबंध येतो. मात्र या दोन्ही सेवा एकत्रित देण्याची सुविधा अनेक डीपी उपलब्ध करून देत असतात. त्याला ट्रेडिंग खाते असे म्हटले जाते. मात्र ते कदापि सक्तीचे नसते. डीपी स्वत: खरेदी –  विक्रीचे व्यवहार करून देत नाही तर अन्य ब्रोकिंग फर्मच्या सहकार्याने डिमॅट खातेदाराला ही सेवा उपलब्ध करून देतो.
* त्याच दोन व्यक्तीच्या नावे, मात्र वेगळय़ा क्रमाने प्रमाणपत्र असेल तर दोन खाती सुरू करता येतात का?
– दोन खाती सुरू करण्याची आवश्यकता नाही. एकच खाते सुरू करून त्यात दोन्ही प्रमाणपत्रे डिमॅट करता येतात. मात्र तसे करताना ‘ट्रान्सपोझिशन’ हा एक सुलभ अर्ज डीपीकडे भरून द्यावा लागतो. याद्वारे आपण दोन्ही प्रमाणपत्रांचे धारक एकच आहेत; फक्त नावांचा क्रम वेगळा आहे, हे जाहीर होते.
* लाभांश मिळण्यासाठी किमान किती काळ शेअरधारक असणे आवश्यक आहे?
– अशी कोणतीही अट नसते. कंपनी जी ‘रेकॉर्ड डेट’ ठरवेल त्या तारखेला तुमच्या खात्यात त्या कंपनीचे शेअर जमा असतील तर तुम्हाला लाभांश मिळतो. असे शेअर दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेले असले तरी चालतात.
* शेअर जारी झाले त्यावेळची सही आठवत नसेल तर काय करावे?
– ‘डिमॅट रिक्वेस्ट फॉर्म’वरील तुमची स्वाक्षरी नोटरी अथवा बँक व्यवस्थापकाकडून प्रमाणित करून घ्यावी.
* डिमॅट खाते आणि बँक खाते ‘लिंक’ करता येते का?
– ‘सीडीएसएल’च्या नेटवर्कला दुसरे कुठलेही नेटवर्क थेट ‘लिंक’ करता येत नाही. मात्र तिच बँक डीपी असेल तर ‘बॅक ऑफिस सॉफ्टवेर’च्या सहाय्याने बँक खाते व डिमॅट खाते यातील डेटा याचा ताळमेळ राखला जाऊ शकतो.
* मृत्युपत्रात डिमॅट खात्यातील शेअर वारसाना कसे वाटावे?
– डिमॅट खातेदार एकापेक्षा अधिक व्यक्तींना वारसदार म्हणून खात्यातील शेअर वाटू शकतो. सर्व वारसदारांनी त्याच डीपीकडे आपापल्या नावांची डिमॅट खाती उघडून ‘नोटराइज्ड कॉपी’सह अर्ज भरून दिल्यानंतर शेअर त्यांच्या खात्यात परावर्तित होतात.    (समाप्त)