दोन ऑक्टोबपर्यंत १०० खेडय़ांमधील कामे सुरूकरणार

उद्योग जगतासह निम्मे योगदान राज्य सरकारचेही

५० टक्के मागास खेडय़ांचा समावेश

उद्योग जगताच्या सहकार्यातून राज्यातील एक हजार खेडय़ांचा ‘आदर्श ग्राम’ संकल्पनेनुसार सर्वागीण कायापालट करण्याच्या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. त्यासाठी विश्वस्त निधीची उभारणी करण्यात येणार असून त्यात उद्योगजगताचा व राज्य सरकारचा हिस्सा प्रत्येकी ५० टक्के राहील. या अभियानातील १०० गावांमध्ये कामाची सुरुवात दोन ऑक्टोबरपासून होईल. यापैकी ५० टक्के गावे ही कमी मानव  विकास निर्देशांक असलेली असतील आणि त्यापैकी २५ टक्के आदिवासी लोकवस्तीची असतील, तर उर्वरित  ५० टक्के गावांची निवड करण्याची मुभा उद्योगजगताला राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या अभियानातील ३०० गावांची जबाबदारी बिर्ला ग्रुपतर्फे राजश्री बिर्ला यांनी लगेच उचलली असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या गावांना सर्वतोपरी मदत करुन जनसहभागातून हे अभियान यशस्वी केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. खेडय़ांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. अनेक कंपन्या सामाजिक दायित्वातून (सीएसआर) बरेच उपक्रम राबवीत असतात. विखुरलेल्या पध्दतीने हे काम सुरु असते. या सर्व योजनांचे व उपक्रमांचे एकजिनसीकरण करुन आणि या सर्व घटकांना एकत्र आणून ‘आदर्श ग्राम’ उभारणीचे हे अभियान राबविल्यास ते अधिक वेगाने व यशस्वी होईल, हे उद्दिष्ट घेऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यानिमित्ताने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, हिंदूुस्थान लिव्हरचे संजीव मेहता, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, व्हिडीओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंत्रालयात झालेल्या चर्चासत्रास आवर्जून उपस्थित होते. गावांचा कायापालट स्वतंत्र न्यास उभारुन केला जाणार असून त्यामध्ये शासकीय प्रतिनिधी आणि उद्योग व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा व्यवस्थापन परिषदेत सहभाग राहील. हा न्याय सार्वजनिक विश्वस्त कायद्यानुसार असावा की कंपनी कायद्यानुसार असावा, याबाबतचा निर्णय लवकरच होईल आणि कामकाजाचे स्वरुपही निश्चित केले जाईल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

बिर्ला समूहाने घेतली ३०० गावांची जबाबदारी

या अभियानातील ३०० गावांची सर्वतोपरी जबाबदारी आदित्य बिर्ला समूहातर्फे राजश्री बिर्ला यांनी उचलली आहे. रिलायन्स समूहाने या एक हजार गावांशी कनेक्टिव्हिटी आणि मुंबईत त्यासाठीचे नियंत्रण केंद्र उभारण्याची तयारी दाखविली. महिंद्रा यांनी रोजगार व प्रशिक्षण विषयक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

असे असेल आदर्श ग्राम..

  • दुष्काळमुक्तीसाठी जलसुरक्षा, जलस्त्रोतांचा विकास, जलपुनर्भरण
  • गावातील लोकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार देणे
  • जल, जंगल व जमिनींचा विकास
  • घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव
  • कृषीपूरक विविध उपाययोजना
  • शिक्षण व आरोग्यसुविधा