युनायटेड स्पिरिट्सवर निम्मी मालकी मिळविताना ब्रिटनच्या डिआजिओने सोमवारी सामान्य भागधारकांना फेरखरेदीच्या खुल्या प्रस्तावाद्वारे (ओपन ऑफर) अतिरिक्त २६ टक्के हिस्सा वाढविण्याचा आणि त्यासाठी ११,४४८.९१ कोटी रुपये मोजण्याची तयारी जाहीर केली. यामुळे कंपनीचा विजय मल्ल्या यांच्या मद्य कंपनीतील हिस्सा २८.७८ टक्क्यांवरून ५४.७८ टक्के होईल. तिमाहीपूर्वी खरेदी केलेल्या समभाग मूल्याच्या तुलनेत २२.५ टक्के अधिक रक्कम मोजून यंदाचा व्यवहार होणार आहे.
जगातील सर्वात मोठी मद्य कंपनी असलेल्या डिआजिओने युनायटेड स्पिरिट्ससाठीच्या प्रत्येक समभागाकरिता ३,०३० रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. तर वर्षभरापूर्वी युनायटेड स्पिरिट्समध्ये प्रथमच शिरकाव करताना डिआजिओने मोजलेली समभागामागील रक्कम ही आताच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी होती. नव्या व्यवहारामुळे डिआजिओची मल्ल्या यांच्या मद्य कंपनीतील एकूण गुंतवणूक १८,०२३.१४ कोटी रुपये होणार आहे.
डिआजिओने  ११ ते २४ जून दरम्यान प्रस्तावित केलेल्या ‘ओपन ऑफर’द्वारे ३.७७ कोटींहून अधिक समभाग खरेदी करण्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या रिले बीव्ही या उपकंपनीमार्फत हा व्यवहार ब्रिटनची ही मद्य कंपनी पार पाडेल. युनायटेड स्पिरिट्समध्ये युनायडेट ब्रुअरिजचा ५.९३ टक्के तर किंगफिशर फिनव्हेस्ट इंडियाचा ३.५८ टक्के हिस्सा आहे.  
डिआजिओच्या मुख्य वित्तीय अधिकारी व कार्यकारी संचालक डेरड्रे मालान यांनी या नव्या व्यवहारामुळे युनायटेड स्पिरिट्सवर वर्चस्व प्राप्त होणार असल्याचे नमूद करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच फेरबदलाचे अधिकार आता आमच्याकडे आहेत, असे स्पष्ट केले. उभय कंपन्यांतील हा संपादन व्यवहार चालू आर्थिक वर्षअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.