दलित उद्योजकांना सहाय्यकारी अशा परिणामकारक धोरणे राबविण्याचा आग्रह या वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने पंतप्रधानांना भेटून केले आहे. ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’चे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संघटनेच्या शिष्टमंडळात यावेळी ‘डिक्की’चे पदाधिकारी उपस्थित होते.
देशात ३० लाखांहून अधिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दलित उद्योजकांमार्फत चालविले जातात. मात्र खास या वर्गासाठी सरकारी अशी कोणतीही धोरणे नाहीत, अशी खंत यावेळी चेंबरचे कांबळे यांनी पंतप्रधानापुढे मांडली. जवळपास सर्व दलित उद्योजक हे पहिल्या फळीतील असून त्यांना आर्थिक तसेच सामाजिक सहकार्यासाठी आयआयएमसारख्या संस्थांद्वारे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली.