शेतीआधारित अर्थकारणात पशुधन हे नियमितपणे रोख उत्पन्न मिळविण्याचे साधन आहे. पिके वाया गेली अथवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही ती विम्यासारखे संरक्षण कवच प्रदान करण्यासाठी उपयोगी ठरतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी येथे नुकतेच केले. इंडियन डेअरी असोसिएशन (आयडीए) यांनी ‘वातावरणातील बदल आणि दुग्धव्यवसाय’ या संकल्पनेवर मंगळवारी आयोजित केलेल्या ४५ व्या डेअरी उद्योग परिषदेत ते बोलत होते.

रथ पुढे म्हणाले, चार ते पाच दशकांपूर्वी आपल्या देशात असणारी दुधाची कमतरता ते सध्याची स्वयंनिर्भरता, या काळात भारतीय दुग्धव्यवसायाची लक्षणीय वाढ झाली. यामध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. पहिले म्हणजे, कृषी उत्पादनांमध्ये स्थिर विकास झाल्याने प्राण्यांना पुरेसे खाद्य आणि चारा उपलब्ध करणे शक्य झाले. दुसरे म्हणजे, प्राण्यांच्या देशी पैदासीला वातावरण अनुरूप वैशिष्टय़ांची धारणा वाढविणारे आमचे क्रॉस ब्रीडिंग धोरण आणि तिसरे म्हणजे, छोटय़ा छोटय़ा लाखो धारकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीच्या व नियंत्रित संस्थांची प्रभावी भूमिका होय.

संशोधनातील निकषावर भर देताना रथ यांनी सांगितले की, उष्मा घातामुळे दूध उत्पादनात घट होते, त्यामध्ये पहिल्या स्तनपानात सुमारे १० ते ३० टक्के तर, दुसऱ्या व तिसऱ्या स्तनपानात ५ ते २० टक्के सरासरी घट होते. तसेच उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटांचा लघू व दीर्घकालीन एकत्रित उष्णता परिणाम हा गुराढोरांच्या आणि म्हशींच्या दूध उत्पादनावर होतो. उष्माघाताचा प्रतिकूल परिणाम जनावरांच्या प्रजोत्पादनांवर होतो, उष्णतेचा स्तर वाजवीपेक्षा जास्त वाढल्यास प्राण्यांच्या गर्भधारणेच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतो. तणावपूर्ण उष्णतेमुळे गर्भाशयातील रक्तपुरवठा कमी होऊन गर्भाची वाढ खुंटते.

जनावरांच्या देशी जातींमध्ये कडक वातावरणातही तगून राहण्याचा आनुवंशिक गुण असतो, योग्य पद्धतीच्या संमिश्र पैदासीला प्रोत्साहन देणारी पैदास धोरण ती जनावरे ठेवल्या जाणाऱ्या प्रदेशांनुरूप अमलात आणले जाऊ  शकते, असेही त्यांनी सूचित केले. एनडीडीबीद्वारे राबिविल्या जाणाऱ्या ‘नॅशनल डेअरी प्लॅन – एनडीपी-१’अंतर्गत, गुरांच्या ११ देशी जातींचा विकास त्या त्या स्थानिक भागात शास्त्रीय निवड पद्धती वापरून, ‘देशी जाती विकास कार्यक्रमांतर्गत’ करण्यात येत आहे.