रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. ऊर्जित पटेल यांच्या नावावर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिकृतपणे बुधवारी शिक्कामोर्तब केले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाची सूत्रे हाती असलेले डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने रिक्त झालेल्या जागेवर डॉ. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमेरिकेतील आर्थिक विचार मंच ‘ब्रुकिंग्ज इन्स्टिटय़ूट’मधील ज्येष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले ऊर्जित पटेल हे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचेही सल्लागार आहेत. भारतातील आयडीएफसी या कंपनीतही ते कार्यकारी संचालक पदावर आहेत. केंद्रीय अर्थसचिव डी. के. मित्तल यांनी डॉ. पटेल यांच्या नावाची घोषणा केली.
येत्या २९ जानेवारी रोजी रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिसऱ्या तिमाहीचा पतधोरणाचा आढावा जाहीर होण्याच्या काही आठवडे आधीच या विभागाची सूत्रे डॉ. पटेल हाती घेत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी गेल्या पतधोरण आढाव्यात जानेवारीत संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत आणि भांडवली बाजारानेही याच अपेक्षेने जोरदार मुसंडी धरली आहे.