आर्थिक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी उपलब्ध कालावधीनुरूप गुंतवणूक पर्यायाची निवड करणे जितके महत्त्वाचे तितकेच नेमक्या वेळी संधींना हेरणारे गुंतवणूक धोरणही लाभकारक ठरत असते. गुंतवणुकीचे गतिमान संतुलित धोरण अर्थात डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन हे या संदर्भात उपयुक्त तंत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. डायनॅमिक गुंतवणूक धोरणावर बेतलेल्या बॅलन्स्ड प्रकारातील म्युच्युअल फंडांची ताजी कामगिरी गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून भांडवली बाजारातील अस्थिरतेला मात देणारी आणि अल्पजोखीमेत उत्तम परतावा देणारी असल्याचे आढळले आहे.

सराईत गुंतवणूकदार असो वा नव्याने गुंतवणूक करू इच्छिणारे त्यांना बाजार कल दीर्घकाळासाठी कसा राहील हे निश्चित करणे खूपच अवघड ठरते. मग त्यांनी काय करावे? गुंतवणुकीचा समतोल साधण्यासाठी काही गुंतवणूक समभागांमध्ये (इक्विटी) तर काही रोख्यांमध्ये (डेट) त्यांनी करावी काय? तर अशा गुंतवणुकीचे त्या त्या समयी प्रमाण काय असावे? प्रसंगी रोख्यातील गुंतवणुकीची विक्री करून समभागांचे प्रमाण वाढविल्यास त्याचे करासंबंधाने परिणाम काय? असे काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात.

सामान्य गुंतवणूकदार कळप मानसिकतेचे पालन करतात आणि जेव्हा बाजारातून खरेदीसाठी झुंबड लागलेली असते तेव्हा खरेदी आणि प्रत्येकजण विक्रीच्या मागे लागलेला असतो तेव्हा विचे धोरण अनुसरतात. अशा धोरणाची परिणती बहुतेक वेळा नुकसानकारकच असते. तर मग आपल्या गुंतवणुकीचे सुयोग्य संतुलनाची नेमकी पद्धत काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजाराशी परिचित नसलेल्या गुंतवणूकदारांनी मालमत्ता वाटपांत पारंगत असलेल्या म्युच्युअल फंडांचा आणि त्यातही डायनॅमिक अँसेट अलोकेशन तंत्रावर चालणाऱ्या फंडांची गुंतवणुकीसाठी निवड करणे श्रेयस्कर ठरेल. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीसारख्या देशातील सर्वात मोठय़ा फंड घराण्याने बाजार मूल्यांकनाचे तंत्र विकसित केले आहे. या फंड घराण्याचे निधी व्यवस्थापक शेअर बाजार मूल्यांकन महागडे नसताना समभाग गुंतवणुकीची मात्रा सर्वाधिक राखतात आणि बाजार तेजीच्या वेळी नफा पदरी बांधून रोख्यांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढवीत नेतात. समभाग आणि रोख्यांमधील ही अदलाबदल फंडाच्या नमूद निर्देशानुसार दररोज, मासिक अथवा तिमाही तत्त्वावर सारखी सुरू असते.

डायनॅमिक फायदे..

  • गेले वर्ष – दीड वर्षांत भांडवली बाजाराने तीव्र स्वरूपाचे चढ—उतार दाखविले तर निर्देशांकांचा वार्षिक परतावा अवघा २ ते ५ टक्के राहिला आहे. बाजाराच्या वादळी उलथापालथी यशसिद्ध मापदंडानुरूप गुंतवणुकीचे संतुलित धोरण फायदेशीर ठरल्याचे दिसते.
  • डायनॅमिक अँसेट अलोकेशन धोरणात समभागांचे मूल्यांकन हे पारंपरिक किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराऐवजी, पुस्तकी मूल्याशी किमतीचे गुणोत्तर (पी/बीव्ही) या आधारे होते. त्यामुळे निर्देशांकाच्या पातळीच्या विपरित पूर्वनिर्धारीत मूल्यांकन स्तरापर्यंत समभागाने पी/बीव्ही गुणोत्तर गाठेपर्यंत या फंडातून त्या विशिष्ट समभागात गुंतवणूक सुरूच असते.
  • गुंतवणूक धोरणात गतिमानता असतानाही, किमान चंचलता असणारे हे फंड आहेत. शिवाय म्युच्युअल फंड असल्याने अल्पतम खर्चात गुंतवणुकीला आवश्यक वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) प्राप्त होते.
  • फंडातून समभागात ६५ टक्कय़ांपर्यंत गुंतवणूक होत असल्याने ते कर कार्यक्षम देखील आहेत. त्यामुळे एक वर्षांपेक्षा अधिक काळ फंडाचे युनिट्स धारण केल्यास, नफा पूर्णपणे करमुक्त असतो. अर्थात चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक दीर्घावधीसाठीच (तीन वर्षांहून अधिक) असायला हवी.

अनेकांगाने अनिश्चितता दाटलेला सद्य काळ डायनॅमिक धाटणीच्या बॅलन्स्ड म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी निश्चितच उपकारक आहे. एक फंड घराणे म्हणून डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन तंत्रावर आमची पूर्ण आस्था आहे. या तंत्राद्वारे गुंतवणुकीतून  बाजाराच्या चढ—उतारातून काही गमावण्याचा धोका आणि चिंता गुंतवणूकदाराला नसते.

निमेश शाह, व्यव. संचालक व मुख्य कार्यकारी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी