विकासाला पूर्वपदावर आणावयाचे झाल्यास योग्य सुशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी गुरुवारी येथे केले.
‘इंडियन र्मचट्स चेंबर’च्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित ‘सुशासनातून विकास’ या परिसंवादात ते बोलत होते. योग्य धोरणे, नेमके नियम याद्वारे अधिक पारदर्शकतेने कारभार चालवला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
चेंबरचे मावळते अध्यक्ष प्रबोध ठक्कर, खासदार तरुण विजय, ओएनजीसीचे अध्यक्ष डी. के. सराफ व सन फार्माचे कार्यकारी संचालक सुधीर वालिया आदी परिसंवादात सहभागी झाले. अ‍ॅम्बिट होल्डिंग्जचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वाधवा यांनी त्याचे सूत्रसंचालन केले.
टाटा म्हणाले की, सुशासनाची अंमलबजावणी टाटा समूहात गेल्या अनेक वर्षांंपासून होत आहे. मात्र त्यासाठीचे नियम ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी निराळे व अन्यांसाठी वेगळे, असे असता कामा नये. उलट सुशासनामुळे कंपन्यांच्या कारभारात समानता व पारदर्शकता येते.
सुशासनाच्या गुणवत्तेवर भर देताना टाटा यांनी गुणवत्तेबरोबर त्याची अंमलबजावणी यातून ते कितपत प्रभावी ठरेल हे अवलंबून असल्याचे नमूद केले. सुशासनासाठी योग्य धोरणे, नेमके नियम यांच्याबरोबरच त्या संदर्भाने सक्तीऐवजी स्वयंस्फूर्तता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सक्तीच्या ‘सीएसआर’ला उद्योजकांचा विरोध
परिसंवादाच्या निमित्ताने सुरू झालेली सुशासनावरील चर्चा अखेर सामाजिक दायित्व उपक्रमांपर्यंत (सीएसआर) येऊन ठेपली. मंचावरील मान्यवरांसह उद्योजक श्रोत्यांमधूनही अनेकांनी असे दायित्व कंपन्या, उद्योगांना बंधनकारक करू नये, असे मत मांडले. नव्या कंपनी कायद्यानुसार, कंपन्यांना त्यांच्या नक्त नफ्यापैकी २ टक्के रक्कम सामाजिक दायित्वापोटी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा उपक्रमांसाठी सक्ती लाभदायी नाही, असेही मत व्यक्त करण्यात आले.

उच्च मूल्यांकन हेच ई-कॉमर्सचे बळ
ल्ल ई-कॉमर्स उद्योग हा भारतासारख्या विकसनशील देशातील एक अनोखी बाजारपेठ असून त्याला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे नमूद करून या क्षेत्रात अधिकतर तरुण उद्यमशील नेतृत्व आहे; तिचे मूल्यांकन अधिक वाटत असले तरी तेच त्याचे बळ आहे, असे रतन टाटा यांनी नमूद केले.
स्नॅपडीलमधील आपल्या गुंतवणुकीबाबत ‘तो पैसा माझा वैयक्तिक आहे; टाटा समूह अथवा तिच्या कोणत्याही कंपनीचे त्यात काहीही योगदान नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले. इ-कॉमर्सचाही फुगा कधीतरी फुटेलच, अशी चर्चा कुठे नाहीच, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.