ऑनलाइन मंचावर १०० पेक्षा अधिक आघाडीच्या परफ्युम उत्पादनांची विक्री करणाऱ्या इबे इंडियाने भारतातील सर्वात मोठे परफ्युम दालन विकसित केले आहे. यानुसार मंचावर आता ग्राहकांना १,००० पेक्षाही अधिक विविध प्रतिष्ठित नाममुद्रेच्या परफ्युममधून खरेदी करता येईल. यात जॉर्जयिो अर्मानी, ब्वल्गरी, हय़ुगो बॉस, चॅनेल आणि डेव्हिडऑफ असे किमान ६० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परफ्युमच्या किमतीची श्रेणी ३९५ ते ५,००० रुपयांपर्यंत आहे. 

भारतातील परफ्युम उद्योगाचे एकूण आकारमान (संघटित आणि असंघटित) सध्या सरासरी २,००० कोटी रुपयांच्या आसपास असून ही बाजारपेठ ५० टक्क्यांनी वाढून ३,००० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. तर ऑनलाइन व्यासपीठाची परफ्युम विक्रीची बाजारपेठ १४८ कोटी रुपयांची असून ती नजीकच्या कालावधीत १२० टक्क्यांनी ३४५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याबाबत इबे इंडियाच्या किरकोळ निर्यात व जीवनशैली विभागाचे प्रमुख नवीन मिस्त्री यांनी सांगितले की, ग्राहक हे वाढत्या संख्येने विविध उत्पादनांची खरेदी करीत असल्यामुळे ऑनलाइन बाजारपेठेचा परफ्युम भाग एकूण परफ्युमच्या बाजारपेठेच्या ७ टक्क्यांवर गेला आहे; त्यात यंदा ११ टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र हे राज्य भारतातील एकूण परफ्युमच्या बाजारपेठेच्या १३ टक्के योगदान राखते, असेही ते म्हणाले.