विद्यमान २०१३-१४ आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेर (ऑक्टो-डिसेंबर २०१३) भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढ ही अवघी ४.९ टक्के राहील, असा आघाडीच्या अर्थविश्लेषकांचा कयास आहे. चढय़ा व्याज दराने ग्रस्त उद्योगक्षेत्राकडून येत्या मे महिन्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालातून जोवर राजकीय सुस्पष्टता येत नाही, तोवर प्रकल्प गुंतवणूकही टांगणीला लागली असेल, असेही या तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या आठवडय़ात ‘रॉयटर्स’ने घेतलेल्या देशातील ३६ अर्थतज्ज्ञांमध्ये घेतलेल्या मत-आजमावणीनुसार, आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत आधीच्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत अवघी ४.९ टक्क्यांनी वाढ होईल, असा निष्कर्ष पुढे आला आहे. हा विकास दर आधीच्या तिमाहीतील ४.८ टक्क्यांइतकाच राहण्याचेच अर्थतज्ज्ञांनी अंदाजले आहे. औद्योगिक उत्पादनात वाढीच्या दरात घसरण ही याचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चढय़ा व्याजदरामुळे महागलेला अर्थपुरवठा आणि दुसरीकडे ग्राहकांकडून आटलेली मागणी या अरिष्टाने उद्योगक्षेत्र वेढलेले असल्याने औद्योगिक उत्पादन दर ढासळत असल्याचे अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.