देशाच्या अर्थव्यवस्थेत उभारी निश्चितपणे दिसून येत आहे आणि सक्षम आर्थिक धोरणे आणि गुंतवणुकीत वाढ झाल्यास विद्यमान २०१४-१५ आर्थिक वर्षांत सहा टक्क्य़ांचा विकासदर गाठता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केले.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, चिदम्बरम यांनी निवडणुकांनंतर येणाऱ्या नव्या सरकारने हंगामी अर्थसंकल्पात त्यांनीच मांडलेल्या १० सूत्री कार्यक्रमानुसार धोरणे राबविल्यास, चालू वर्ष अर्थव्यवस्थेसाठी खूपच चांगले राहील, असा विश्वास व्यक्त केला. अत्यंत वेगवान विकासाचा काळ पाहिल्यानंतर लोकांसाठी मंदीचा काळ पचवला जाणे अवघडच असते. तरी जगातील अन्य १७० देशांपेक्षा भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा मंदावलेला वेगही सरसच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. क्रयशक्तीच्या तुलनेत भारताने जपानला मागे सारून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान कमावल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सिन्हांवर तोंडसुख!
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्यावर चिदम्बरम यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. सिन्हा यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.६ टक्क्य़ांवर खाली आणल्याचा चिदम्बरम यांचा दावा म्हणजे फसवणूक असल्याच्या केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.  २०००-२००१ आणि २००२-०३ हा उदारीकरणाच्या पर्वातील अर्थव्यवस्थेसाठी सर्वात वाईट काळ राहिला असून, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांचे अर्थमंत्री म्हणून सिन्हा यांची अखेर उचलबांगडी करणे भाग ठरले होते, अशी चिदम्बरम यांनी मल्लिनाथी केली. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची प्रगती ही त्या आधीच्या भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत कैक अंगाने उजवी राहिल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), थेट कर संहिता (डीटीसी) आणि विमा विधेयक यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना खोडा घालण्यात भाजप आणि त्यांची सत्ता असलेली राज्येच जबाबदार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.