मुंबईत सुटय़ा प्रकारात विकले जाणाऱ्या खाद्यतेलांपैकी सुमारे ६४ टक्के तेल हे भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत ग्राहक मार्गदर्शन सोसायटीमार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे.
ग्राहकहितासाठी झटणाऱ्या या संघटनेने मुंबई शहर व उपनगरात किरकोळ विक्री होणाऱ्या खाद्यतेलांचे नमुने घेत ही तपासणी केली. यासाठी तब्बल २६९ नमुने घेण्यात आले. प्रत्येकी १०० ग्रॅम वजनातील हे नमुने संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते यांनी त्यांचे वास्तव्य असलेल्या नजीकच्या ठिकाणाहून प्लॅस्टिकच्या पिशवीत ते गोळा केले. यानंतर ते मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले. संस्थेच्या रसायनतज्ज्ञांनीही हे नमुने नजरेखालून घातले. गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये तिळाचे तेल, खोबरेल तेल, शेंगदाणा तेल, मोहरी तेल, सूर्यफूल तेल, कापूसबियांचे तेल, सोयाबीनचे तेल आदींचा समावेश होता.
भेसळयुक्त तेल समोर आणण्याच्या प्रक्रियेबाबत संस्थेचे सरचिटणीस एम. एस. कामथ म्हणाले की, या तेलामध्ये मोठय़ा प्रमाणात पामोलिनचा अंश आढळला. काहींमध्ये तर तो तब्बल ९० टक्क्यांपर्यंत होता. सुदैवाने यात जीवितहानी करणाऱ्या घटकांचा समावेश नव्हता. मात्र आरोग्याच्या दृष्टीने हे तेल अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
बाजारात आजच्या घडीला शाम्पू, टूथपेस्ट, शीतपेयेदेखील छोटय़ा पाकिटात विकले जातात. मग खाद्यतेल का नाही? महाराष्ट्र शासनाने अशा कमी आकारातील पाकिटबंद वेष्टनातून खाद्यतेल विकण्यास परवानगी द्यावी. कमी दरात निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल  सुटे विकून गरिबांच्या आरोग्याशी खेळणे आता थांबले पाहिजे.
– डॉ. सीताराम दीक्षित,
अध्यक्ष, भारतीय ग्राहक मार्गदर्शन सोसायटी