जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि भांडवली बाजार यांचा घनिष्ट संबंध असल्याचे अलीकडे अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या उमेदवारांवरून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवरील डाऊ जोन्स हा प्रतिष्ठित शेअर बाजार आणि आपल्याकडील मुंबई शेअर बाजार यांच्या निवडणूक कौलाला प्रतिसाद ताजा अपवाद वगळता क्वचितच एकसारखा राहिला असल्याचे दिसून येते.
बराक ओबांमा दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले म्हणून डाऊ जोन्सने त्यांचे एक टक्के वाढ दर्शवून स्वागत केले आहे. यापूर्वी पहिल्यांदा ते अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हा मात्र अमेरिकेचा हा प्रमुख निर्देशांक तब्बल ५.०४ टक्क्य़ांनी आपटला होता. यापूर्वी वॉल स्ट्रीटच्या अगदी उलट आपल्या दलाल स्ट्रीटची प्रतिक्रिया अनुभवण्यात आली आहे.
प्रतिक्रिया स्वरूपात १३३ वर्षे जुन्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आज ०.४५ टक्क्य़ांनी वधारला. तर यापूर्वी ४ नोव्हेंबर २००८ रोजी तो (डेमोक्रॅट ओबामा पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा) २.८४ टक्क्य़ांनी उंचावला होता. तर यापूर्वी नोव्हेंबर २००४ मध्ये डाऊ जोन्स तसेच सेन्सेक्स दोन्हीही एक टक्क्य़ांपर्यंत वधारले होते. रिपब्लिकनचे जॉर्ज डब्ल्यू बुश नोव्हेंबर २००० मध्ये काठावर निवडून आले तेव्हा मात्र दोन्ही निर्देशांकाची परिस्थिती २००८ प्रमाणेच होती.
एकच अध्यक्ष दुसऱ्यांदा होताना यंदाचा दोन्ही प्रमुख भांडवली बाजाराच्या वाढीचा कित्ता डेमोक्रेटिकचे बिल क्लिंटन यांच्या वेळी मात्र चुकला होता. ओबामा आणि जॉर्ज डब्ल्यू बुश (अनुक्रमे डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्ष) हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले तेव्हा या दोन्ही निर्देशांकानी वाढ नोंदविली.
मात्र ५ नोव्हेंबर १९९६ रोजी क्लिंटन ४२ वे अध्यक्ष म्हणून जाहीर झाले तेव्हा डाऊ जोन्स वधारला होता; तर सेन्सेक्स घसरला होता.

निवडणूक कौलावर दलाल स्ट्रीट- वॉल स्ट्रीटच्या वेगवेगळ्या तऱ्हा
निकालाची तारीख    अध्यक्ष                पक्ष         डाऊ जोन्स      सेन्सेक्स
६ नोव्हेंबर २०१२    बराक ओबामा      डेमोक्रेटिक       +१%        +०.४५%
४ नोव्हेंबर २००८    बराक ओबामा     डेमोक्रेटिक      -५.०४       +२.८४%
२ नोव्हेंबर २००४    जॉर्ज डब्ल्यू बुश  रिपब्लिकन     +१.०१%    +०.८७%
७ नोव्हेंबर २०००    जॉर्ज डब्ल्यू बुश  रिपब्लिकन    -०.४१%     +०.५९%
५ नोव्हेंबर १९९६    बिल क्लिंटन       डेमोक्रेटिक      +१.५८%    -०.९६%
३ नोव्हेंबर १९९२    बिल क्लिंटन        डेमोक्रेटिक     -०.९०%     +३.३७%