औषध कंपन्यांमधील ताबा आणि विलीनीकरणाची प्रक्रिया अद्यापही कायम आहे. रॅनबॅक्झीवर सन फार्माने ताबा घेतल्यानंतर आता ग्लॅक्सोस्मिथक्लाइनच्या (जीएसके) कर्करोग औषधांचा व्यवसाय स्वित्झर्लन्डच्या नोवार्टिसने खरेदी केला आहे. तर नोवार्टिसने आपला लस उद्योग जीएसकेकडे हस्तांतरित केला आहे. उभय कंपन्यांमार्फत निवडक औषधांच्या खरेदी-विक्रीचे आदानप्रदान होतानाच ग्राहक आरोग्य निगा व्यवसायात मात्र एकत्रित काम करण्याचे ठरविण्यात आले आहे. या माध्यमातून या क्षेत्रातील सर्वात मोठी औषध कंपनी उदयास आली आहे.
लंडनस्थित ग्लॅक्सोस्मिथक्लाइनचा कर्करोग औषध व्यवसाय नोवार्टिसने १६ अब्ज डॉलरला खरेदी केला आहे, तर नोवार्टिसने तापाची लस वगळता इतर सर्व लस व्यवसाय जीएसकेला ७.१ अब्ज डॉलरला देऊ केला आहे. याचबरोबर या दोन्ही कंपन्या १० अब्ज डॉलरच्या वार्षिक व्यवसाय असलेल्या ग्राहक आरोग्य निगा व्यवसायासाठी एकत्र आल्या आहेत. मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय मिळणारी औषधे समकक्ष उत्पादनांसाठीच्या (ओव्हर द काऊंटर म्हणजेच ओटीसी) नव्या भागीदार कंपनीत जीएसकेचा सर्वाधिक ६३.५ टक्के हिस्सा असेल. निवडक लस उद्योगासह कर्करोग निदान क्षेत्रातील औषध व्यवसायवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नोवार्टिसने प्राण्यांसाठीच्या औषधावरील आपला भरही कमी केला आहे. कंपनीने हा विभाग लिली कंपनीला ५.४ अब्ज डॉलरला विकल्याचेही जाहीर केले आहे.
जीएसकेचा भारतीय ‘ओटीसी’ व्यवसाय जैसे थे!
मुंबई : ग्राहक औषध निगा उत्पादनांमध्ये झालेल्या जीएसके-नोवार्टिसच्या जागतिक स्तरावरील भागीदारीमुळे जीएसकेच्या भारतीय व्यवसायावर परिणाम होणार नसल्याची ग्वाही देण्यात आली आहे. ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड, इंडिया’ला (जीएसकेसीएच) या व्यवहारातून वगळण्यात आल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. व्यवहाराच्या वृत्तानंतर मुंबई शेअर बाजारात जीएसकेसीएचचा समभाग ०.०६ टक्क्यांनी वधारत ४,३६८ रुपये झाला, तर सत्रात २० टक्क्यांपर्यंत झेपावणारा नोवार्टिसचा समभाग दिवसअखेर ६.३४ टक्के वाढीसह ४९७.२० रुपयांवर स्थिरावला. भारतातील ‘ओव्हर द काऊंटर- ओटीसी’ व्यवसायामध्ये जीएसके समूहाचा हिस्सा कायम असेल, असे भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीने स्पष्ट केले. समूहाने भारतातील कंपनीतील हिस्सा नुकताच ७५ टक्क्यांपर्यंत वाढविला.
‘क्रोसिन’च्या किमतवाढीचा तिढा सुटला!
मुंबई : वेदनाशामक ‘पॅरासिटामॉल’चा मुख्य अंश असलेल्या ‘क्रोसिन’ची किंमत नव्या औषध किंमत नियंत्रण धोरणाद्वारे ९.४० रुपये प्रति १० गोळ्या निश्चित करण्यात आली आहे. मात्र ‘जीएसकेसीएच’ने आपल्या ‘क्रोसिन अॅडव्हान्स’ या उत्पादनाची किंमत काही दिवसांपूर्वी वाढवून २० रुपये केली होती. तथापि औषध नियामकांकडून दट्टय़ा आल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील दुकांनामध्ये ‘क्रोसिन’चा पुरवठा अपुरा पडू लागला. परिणामी कंपनीने किमती कमी करण्याची तयारी दाखविली आहे.