जगभरात प्रसिद्ध असलेले बॉलीवूड व अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेला माध्यम व मनोरंजन उद्योग यांची एकत्रित वाटचाल येत्या पाच वर्षांत दुप्पट होण्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय माध्यम व मनोरंजन क्षेत्राची वृद्धी १३.९ टक्के असेल, असा विश्वास ‘केपीएमजी’च्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय मनोरंजन आणि उद्योगाची सांगड घालणाऱ्या वार्षिक ‘फिक्की-फ्रेम्स’चे यंदाचे पर्व बुधवारच्या परिषदेमार्फत सुरू झाले. मुंबई उपनगरातील पंचतारांकित आदरातिथ्य स्थळी ही परिषद तीन दिवस चालणार आहे. या परिषदेच्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय संस्थेने अहवाल जारी केला.
यानुसार २०१४ मध्ये नोंदविण्यात आलेले १,०२,६०० कोटी रुपयांचे माध्यम व मनोरंजन क्षेत्र २०१९ मध्ये १,९६,४०० कोटी रुपयांवर जाईल. वाढते स्मार्टफोन आणि इंटरनेट यामुळे डिजिटल माध्यमांचा या क्षेत्रात आगामी कालावधीत वरचष्मा असेल, असे अहवालात म्हटले आहे.
सध्या लोकप्रिय होत असलेल्या ई-कॉमर्समुळे जाहिरात बाजारपेठेचा अंकुश या क्षेत्रावरही दिसून येईल; तसेच डिजिटलायजेशनमुळे दूरसंचार क्षेत्राची वाढ कायम राहणार असून, एकूण माध्यम क्षेत्रात डिजिटल क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘फिक्की-फ्रेम्स’साठी ‘केपीएमजी’ने तयार केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवाढीचा उल्लेख करताना सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी संघटना तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दाखला देण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था चीनला मागे टाकेल, हा विश्वासही यातून दाखविण्यात आला आहे.

माथूर उवाच..
*प्रस्तावित वस्तू व सेवा करामुळे मनोरंजन उद्योगाची कर तक्रार संपणार
*विकसित तंत्रज्ञानाची मोबाइल अ‍ॅप आदी नवी माध्यमे
*भारताला जागतिक चित्रपट केंद्र बनविण्याचा विचार
*सरकारचा डिजिटल इंडिया प्रवास प्रगतीपथावर
*वर्षभरात डिजिटलायझेशन संपूर्ण भारतभरात

आणखी १००० एफएम वाहिन्या येणार!
देशभरात आणखी १००० एफएम वाहिन्यांसाठीच्या ध्वनिलहरी खुल्या करण्याच्या विचारात सरकार असल्याची माहिती माहिती व प्रसारण खात्याचे अतिरिक्त सचिव जे. एस. माथूर यांनी ‘फिक्की-फ्रेम्स-२०१५’च्या व्यासपीठावरून मुंबईत दिली. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या गटाच्या प्रलंबित रेडिओ ध्वनिलहरींच्या लिलावाला सरकारने मान्यता दिली असून, या माध्यमातून ६९ शहरांमध्ये १३५ वाहिन्या सुरू होतील, असेही ते म्हणाले.

भारतीय माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील ताबा-विलीनीकरण :
    व्यवहार     रक्कम
 संख्या   (डॉलरमध्ये)
२०१४    ६१    २३८ कोटी            
२०१३    २६  २२.४० कोटी