भांडवली बाजारातील अव्याहत तेजीच्या जोरावर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या दोनच महिन्यांत समभागांशी निगडित म्युच्युअल फंड अर्थात इक्विटी फंडांमध्ये तब्बल २०,६६० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आली आहे.
बाजारात गेल्या काही दिवसांत अस्थिरता नोंदली गेली असली तरी इक्विटी फंडांमधील निधीचा ओघ मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी कायम राहील, असा विश्वास फंड व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे, किंबहुना विदेशी गुंतवणूकदारांचा बाजारातील जोर ओसरून, गेल्या आठवडय़ापासून बाजारातील निर्देशांकांच्या दौडीस म्युच्युअल फंडांकडील झालेल्या खरेदीपायीच असल्याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
गत २०१४-१५ आर्थिक वर्षांत समभाग निगडित फंडांतील मालमत्ता ७०,००० कोटी रुपयांनी वाढली होती. देशातील ४४ फंड घराण्याचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) च्या ताज्या आकडेवारीनुसार नव्या आर्थिक वर्षांतील एप्रिल व मे या दोन महिन्यांत समभाग निगडित म्युच्युअल फंड योजनांमध्ये २०,६६० कोटी रुपये गुंतवणूकदारांनी ओतले आहेत. पैकी मे महिन्यामधील गुंतवणूक १०,०७६ कोटी रुपयांहून अधिक आहे.